धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश ,‘छांगूर बाबा’चे पुणे कनेक्शन उघड, लोणावळ्यात 16 कोटी रुपयांची जमीन खरेदी

विशेष प्रतिनिधी

पुणे : उत्तर प्रदेश एटीएसने मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला असून, यामध्ये छांगूर बाबा आणि त्याची प्रमुख सहकारी नीतू उर्फ नसरीन यांना अटक करून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांविरोधात जबरदस्ती, फसवणूक, मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर मालमत्तेच्या आधारे धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप आहे. (Conversion racket exposed Pune connection of Changur Baba revealedland worth Rs 16 crore purchased in Lonavala)

प्राथमिक तपासात समोर आले आहे की छांगूर बाबा आणि त्याची टोळी गेल्या १५ वर्षांपासून विविध राज्यांमध्ये, विशेषतः महाराष्ट्रात, धर्मांतराच्या कारवायांमध्ये सक्रिय होती. ही टोळी चमत्कार, भूतबाधा दूर करणे, धार्मिक प्रलोभने अशा माध्यमातून लोकांना गोंधळात टाकून त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करत असे आणि त्यांचं धर्मांतर घडवून आणत असे. बाबा स्वतःला धार्मिक गुरु म्हणवून लोकांमध्ये विश्वास निर्माण करत असे, तर त्याची सहकारी नसरीन पूर्वनियोजित पद्धतीने लोकांना फसवण्यासाठी मानसिक जाळं विणत असे.

तपासादरम्यान छांगूर बाबाचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. बाबाने पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात तब्बल १६ कोटी रुपयांची जमीन खरेदी केल्याचे समोर आले असून, संबंधित व्यवहाराची नोंदणीही झाली होती. मात्र आता उघडकीस आले आहे की या व्यवहारात त्याने पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या मोहम्मद खान नावाच्या व्यक्तीची फसवणूक केली आहे.

मोहम्मद खान हा छांगूर बाबाचा हस्तक आणि अकाउंटंट म्हणून ओळखला जात होता. मात्र या प्रकरणात नाट्यमय वळण येत, मोहम्मद खाननेच छांगूर बाबा आणि त्याच्या टोळीच्या फसवणूक तंत्राचा भांडाफोड केला आहे. त्याने तपास यंत्रणांना माहिती दिली की छांगूर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोणत्या प्रकारे लोकांची फसवणूक करून धर्मांतर घडवले, पैसे उकळले आणि काळा पैसा मालमत्तांमध्ये गुंतवला.

छांगूर बाबाचे पुणे कनेक्शन समोर आल्याने, त्याने महाराष्ट्रात देखील अनेकांना फसवले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी तपास अधिक गडद करत महाराष्ट्रातील त्याचे नेटवर्क, आर्थिक व्यवहार व बेकायदेशीर मालमत्तेची माहिती गोळा करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.

रिमांडच्या कालावधीत छांगूर बाबा आणि नसरीन यांच्याकडून नेटवर्कचा विस्तार, पैशांचा प्रवाह (मनी लाँड्रिंग), बेकायदेशीर मिळवलेली मालमत्ता आणि धर्मांतरात सामील असलेल्या इतर हस्तकांची माहिती उघड करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.