मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ठरले अधिवेशनाचे ‘हिरो’; अभ्यासपूर्ण मांडणीने विरोधकांची बोलती बंद

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजले. मात्र संपूर्ण अधिवेशनात जे नाव सतत चर्चेत राहिले, ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण, मुद्देसूद आणि माहितीपूर्ण भाषणांनी त्यांनी विरोधकांना वारंवार नामोहरम केले. विशेषतः अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात त्यांनी राज्याच्या विकासाचे समग्र चित्र सभागृहासमोर मांडले आणि विधिमंडळातील चर्चेवर छाप सोडली. ( Chief Minister Devendra Fadnavis became thehero of the convention The opposition was silenced by his scholarly presentation)

मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये तांत्रिक बारकावे, योजनांचा आढावा, तरतुदींचे स्पष्ट विवरण आणि विद्यमान सरकारच्या यशस्वी प्रकल्पांची उदाहरणे यांचा योग्य समन्वय होता. फक्त राजकीय आरोपांना उत्तर देणे एवढ्यावर ते थांबले नाहीत, तर त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांची विचारपूर्वक मांडणी करत ही धोरणे जनहितासाठी का आवश्यक आहेत, याचे ठोस स्पष्टीकरणही दिले.

काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे विजय वडेट्टीवार आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांनी सरकारवर टीका केली. परंतु, फडणवीस यांनी संयम राखत, संख्याशास्त्र, कायदाशास्त्र आणि प्रशासनशास्त्र यांचा योग्य वापर करून प्रत्येक मुद्द्यावर प्रभावी प्रत्युत्तर दिले.

‘ना हनी आहे, ना ट्रॅप’ या एका वाक्याने त्यांनी नाना पटोलेंच्या आरोपांची धुळधाण केली आणि सभागृहातील बाकांवर हास्याचा पाऊस पाडला. सभागृहाचा वेळ वाया घालविल्याबद्दल पटोले यांना खडसावताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी कसे काम करावे याची शाळाच घेतली. सबळ पुरावे आणायचे, जोरदार मांडणी करायची आणि सरकारला जाब विचारायचा ही विरोधकांनी केले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने पटोलेंनी आपली पतही गमावली.

जनसुरक्षा कायद्यावरून तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. बाहेर या कायद्याला विरोध करत असताना सभागृहात मात्र मुख्यमंत्र्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे तोंड उघडता आले नाही. जनसुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला थेट अटक करता येत नाही. व्यक्तीविरोधात अटकेची कारवाई करण्यासाठी ठोस आणि न्यायिकरित्या ग्राह्य धरता येणारे पुरावे आवश्यक असतात. तसेच, एखाद्या संघटनेवर बंदी घालायची असल्यासही ती कार्यवाही न्यायालयीन देखरेखीखाली होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि लोकशाही तत्वांचे काटेकोर पालन करूनच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा तयार करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनाच्या चर्चेत भाग घेताना मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षभरात सरकारने केलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी ‘डबल इंजिन सरकार’च्या माध्यमातून राज्यात आलेली प्रगती अधोरेखित करत, विशेषतः पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगारनिर्मिती, पाणीटंचाई निवारण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांतील योजनांची माहिती दिली.

त्यांच्या या समग्र सादरीकरणाने विरोधकांना तोंड उघडायला वाव राहिला नाही. विविध पक्षांचे सदस्य आणि माध्यमांनीही त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकास’ या अजेंड्याला केंद्रस्थानी ठेवत राजकीय वर्चस्व सिद्ध केल्याचे स्पष्ट झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात एकूणच सरकारचा यशस्वी कारभार, धोरणात्मक निर्णय, पायाभूत विकासाच्या योजना आणि सामाजिक हिताच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी केवळ रक्षणात्मक भुमिका घेतली नाही, तर सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्ष अंमलात आलेल्या योजनांचे संख्यात्मक आणि गुणात्मक विश्लेषण करून विरोधकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले.

विशेषतः अंतिम आठवडा प्रस्तावावरील त्यांचे दीर्घ भाषण म्हणजे जणू महाराष्ट्राची विकासगाथा होती. महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना वेगाने चालना देण्यात येत आहे. राज्याच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून शहरी आणि ग्रामीण विकास अधिक गतिमान केला जात आहे. तसेच, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे. यामुळे सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसारखे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी केवळ सभागृहातच नव्हे, तर जनमानसातही प्रभाव निर्माण केला आहे. माध्यमांमध्येही त्यांच्याच भाषणांची चर्चा झाली. राजकीय नजरेने पाहता, या अधिवेशनात फडणवीस यांनी विकासाच्या जोरावर लोकांचा विश्वास संपादन करण्याची रणनिती राबवली. त्यामुळेच अनेक राजकीय विश्लेषक म्हणत आहेत की, “हे अधिवेशन देवेंद्र फडणवीस यांचे होते. अभ्यास, आत्मविश्वास आणि प्रभाव या तिन्हीचा उत्कृष्ट संगम होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *