विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत आता पुढील राजकीय भविष्य दिसत नसल्याने त्यांनी एकनाथ शिंदेंकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. उध्दव ठाकरे हे एकनाथ शिंदेंना पाण्यात पाहत असताना दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
( Ambadas Danve fielding Shinde as he is unable to get elected to the Legislative Council Expectation of both Shiv Sena to come together)
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दानवे म्हणाले , शिवसेना फुटल्याची खंत असून, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी आशा आहे. शिवसेना म्हणून आपण एकत्र असले पाहिजे, शिवसेनेची एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे. अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांचा निरोप समारंभ पार पडला. अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या फोटोसेशन वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांकडे पाहणे टाळले होते आणि बाजूला बसणे देखील टाळले होते.
अंबादास दानवे त्यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, “मी तेवढा मोठा नाहीये. पण निश्चित मी त्यादिवशी सुरुवातीलाच म्हटले की, मनाला वेदना झाल्या. जी संघटना अखंड ताकदवान होती, ठीक आहे, सत्तेत बसणे वगैरे, आम्ही काय सत्तेसाठी जन्माला आलेलो नाहीत. सत्ता येईल आणि जाईल. पण जी संघटना फुटली त्याच्या वेदना मनाला आणि हृदयाला झालेल्याच होत्या. या वेदना कधी ना कधी भरुन निघाव्यात असे मनाला वाटत असते. सगळे एकत्र असले पाहिजे. सगळे लोकं असले पाहिजेत. कारण आपली शिवसेनेचे राज्य असले पाहिजे. आपली महाराष्ट्रात ताकद असली पाहिजे, असे मला शिवसैनिक म्हणून वाटतंच. आशा ठेवायला काही हरकत नाही. मी कुणाविषयी वैयक्तिक सल ठेवणार नाही. पण मनाला ही सल कायम आहे की, आपली एवढी मजबूत संघटना कुणीतरी फोडली. तिला कुणाची तरी दृष्ट लागली. संघटना तेवढीच मजबूत व्हावी हीच माझी इच्छा आहे”, असेही अंबादास दानवे म्हणाले.
अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील आमदारकीचा काळ संपुष्टात येणार आहे.ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर पुन्हा आमदार म्हणून निवडून येणे शक्य आहे का? यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अंबादास दानवे यांना पुन्हा त्याच जागेवर निवडून येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे आवश्यक आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच संबंधित विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. तोपर्यंत अंबादास दानवे यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. विधान परिषदेच्या काही जागांचा कार्यकाळ 2026 मध्ये पूर्ण होणार आहे. मात्र, जर विधानसभा सदस्यांमार्फत निवडून येण्याचा पर्याय विचारात घेतला, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ 20 आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे तो मार्ग कठीण आहे. विधान परिषदेसाठी आवश्यक असलेल्या 40 ते 45 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय ही निवडणूक शक्य नाही.
