पुणे : बहिणीने प्रेमविवाह केल्याने कौटुंबिक वैराचे रूपांतर रक्तरंजित हत्याकांडात होऊन शनिवारी पहाटे २८ वर्षीय केतन विनोद सुडगे याचा त्याच्या मेव्हण्याने आणि साथीदारांनी अमानुष खून केला.
पोलीसांच्या माहितीनुसार, केतनचा सुमारे दीड वर्षांपूर्वी दिक्षा सोनवणे हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. मात्र या विवाहाला मुलीच्या कुटुंबाचा विरोध होता. त्याचाच राग काढण्यासाठी आरोपींनी निर्घृण हल्ला केला.
घटनेच्या दिवशी केतनची आरोपींशी गाठ पडली. सुरुवातीला शिवीगाळ झाली. मात्र काही मिनिटांतच आरोपींनी केतनवर दगड, विटा, नालीचे झाकण आणि जड वस्तूंनी तुफानी प्रहार केला. जागीच मृत्यू झाला.
आरोपींमध्ये निखिल सुनील चितारे, प्रेम तुषार जाधव, विवेक विनोद कांबळे आणि विक्रांत विनोद कांबळे यांचा समावेश असून चौघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
उपपोलीस आयुक्त बापू राव दादस यांनी सांगितले की, “आरोपींना अटक केली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पुढील कठोर कारवाई केली जाणार आहे.”
