विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरेगाव पार्क येथील प्रसिद्ध असलेल्या ‘हॉटेल ब्ल्यू डायमंड’मध्ये हाणामारीची घटना घडली असून एका वेटरवर तीन जणांनी हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांनी पाण्याने भरलेली काचेची बाटली फोडून दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. किरकोळ कारणावरून ही घटना घडली.
कोरेगाव पार्क पोलिसांनी तीन अज्ञात हल्लेखोरांवर भारतीय न्याय संहिता कलम ११५ (१), ३२४, ३२९, ३३३, ३५१ (१), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चार्ल्स लॉरेन्स गायकवाड (वय ४८, रा. सदगुरु सोसायटी, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ब्ल्यू डायमंड हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी कॉफी शॉपमधील वेटर राहीन नशरुददीन शेख याच्याकडे जेवणाबाबत चौकशी केली. त्यावेळी, शेख याने लंच देण्यास विंलब होईल असे सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी वेटर राहीन शेख याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या कानशिलात मारुन टेबलावरील पाण्याने भरलेली काचेची बॉटल रागात खाली आपटून फोडली. हॉटेलचे नुकसान करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ( Brawl Erupts at Punes Iconic Blue Diamond Hotel Three Men Attack Waiter Over Lunch Delay)
