डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : दिवाळीच्या पूर्वसंध्येला समर्थ पोलिसांनी कारवाई करीत एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. घरफोडी प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ही कारवाई केली. ( Housebreaking innkeeper arrested)
शिवाजी रामचंद्र खंडागळे (वय २९, रा. सांगलीवाडी, ता. मिरज, जि. सांगली) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास, पूजा करण्यासाठी घरात ठेवलेले ५० हजार रुपये आणि सुमारे तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने एका घरामधून चोरट्याने लंपास केले होते. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शिवाजी खंडागळे यांच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी गुन्ह्यातील चोरट्याचा शोध घेऊन सांगलीपर्यंत माग काढला.
पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि तीन सोन्याच्या अंगठ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खंडागळे याच्यावर यापूर्वीही सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते व त्यांच्या पथकाने केली.
