विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील शिवसेनेची ओळख असलेल्या सुतार कुटुंबानेही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ( Prithviraj Sutar and Sanjay Bhosale Join BJP Big Blow to Thackeray Faction)
गेल्या काही दिवसांपासून भाजप पुण्यात सर्वच पक्षांना धक्के देत आहे. आज भाजपाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक धक्का दिला असून पक्षाचे दोन माजी गटनेते गळाला लावले. या दोन्ही माजी गटनेत्यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपामधील इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू असून मंगळवारी उद्धव ठाकरे यांचे पुण्यातील महत्वाचे शिलेदार भाजपात डेरेदाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महापालिकेत या दोघांनीही शिवसेनेचे गटनते म्हणून काम पाहिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे दोघेही ज्येष्ठ नगरसेवक असून या दोघांच्या जाण्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये पृथ्वीराज सुतार हे गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. ते माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव आहेत.
वडगाव शेरी मतदारसंघामधील येरवडा भागात संजय भोसले हे माजी नगरसेवक आहेत. त्यांचे या परिसरात उत्तम संबंध आणि संपर्क आहेत. या दोघांच्या भाजपमध्ये जाण्याने शहरांमधील शिवसेनेची ताकद आणखी कमी झाली आहे. पुण्यातील भाजपच्या शहर कार्यालयामध्ये मंत्री मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्या उपस्थितीत या दोघांचा प्रवेश झाला.
