विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र निवडणूक लढवावी, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आपल्यापर्यंत आलेला नसल्याचे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ( Supriya Sule says there is no proposal yet for both nationalists to contest together)
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये स्थानिक पातळीवर बैठका सुरू असल्याच्या चर्चा आहेत. जागावाटपाबाबतही चर्चा होत असल्याचे बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात कोणताही अंतिम प्रस्ताव आलेला नाही, असे सुळे यांनी सांगितले. प्रस्ताव आल्यावर त्याची माहिती आपणच माध्यमांना देऊ, असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार, अशा चर्चा सुरू आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या की, सध्या जागांची संख्या किंवा इतर कोणत्याही समन्वयाबाबत आपल्याला माहिती नाही. चर्चा झाल्या असतील, मात्र त्यातून कोणताही अंतिम प्रस्ताव समोर आलेला नाही. पक्षाचे नेते विशाल तांबे, अंकुश काकडे आणि वंदना चव्हाण हे प्रस्ताव तयार करून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सादर करणार असून, त्यानंतरच याबाबत अधिकृत घोषणा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांना एकत्र आणण्यासाठी चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे घेतील, असे सुळे यांनी सांगितले.
काँग्रेससोबतच्या युतीबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. गेल्या १८ वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्यात आलेल्या नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून त्यांना संधी मिळाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. भाजप काँग्रेसमुक्त भारताची भाषा करत होते, मात्र आता तेच लोक भाजपमध्ये जात असल्याची टीका करत, फक्त चिन्ह बदलले आहे, माणसे तीच आहेत, असे सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याला शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आपण राजीनामा देऊ, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह शहराध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी अधिक भाष्य टाळले. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा, रोज नवी सकाळ होत असते, एवढेच त्या म्हणाल्या. या विषयावर विचारण्यात आलेल्या चार ते पाच प्रश्नांना त्यांनी याच एका वाक्यात उत्तर दिले.
