मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर आता विरोधी पक्षनेतेपदी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने आमदार संख्येचे आधारे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतला. मात्र पावसाळी अधिवेशन सुरु होऊन एक आठवडा उलटला तरी विरोधी पक्ष नेता कोण याचं उत्तर मिळालेलं नव्हतं. अखेर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळाला आहे.
महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पद काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांना देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरात यांना हा निर्णय दिल्ली हायकंमाडने कळवला आहे. त्याचबरोबर आता महाराष्ट्राच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदी विजय वड्डेटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे. या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडकडून अचानक विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
ओबीसी नेते म्हणून ओळख असलेले विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यांतील राजकारणावर आपली पकड मजबूत केली. त्यांची विधिमंडळावरील त्यांची ही पाचवी टर्म आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मदत व पुनर्वसनमंत्रीपदही भूषविले आहे. कोरोना काळात ठाकरे सरकारने घेतलेल्या भूमिकांचे त्यांनी आक्रमकपणे समर्थन केले. अलीकडेच स्थानिक निवडणुकीच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही थेट पंगा घेतला होता. त्यामुळे बाळासाहेब थोरात गटनेते असले तरी, आपली भूमिका आक्रमकपणे मांडतानाच त्यावर ठाम राहणाऱ्या विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. आता दिल्ली हायकमांडने विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे.
