ठाण्यातील शिवसेनेच्या कुंभारवाडा शाखेवर दावा करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये चुरस…!

ठाणे जिल्ह्यातील कुंभारवाडा शाखेवर दावा करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे.  कुंभारवाडा शाखा ताब्यात घेण्यावरुन दोन्ही गट आमनेसामने आले. त्यानंतर सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाचं ? यावरुन वाद सुरु असतानाच ठाण्यातील कुंभारवाडा येथील शिवसेनेची शाखा कोणाची यावरुन देखील आता शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आले आहेत. दोन्हीं गटांनी या शाखेवर आपला दावा सांगितला आहे.



मनोरमानगरमध्ये असलेल्या या शाखेबाहेर दोन्ही गटात राडा पाहायला मिळाला. त्यानंतर सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे गटाचे (Thackeray) कार्यकर्ते आज (7 ऑक्टोबर) कुंभारवाडा शाखेत बसले असताना शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित झाल्याने वाद वाढला. यावेळी शिंदे गटातील स्थानिक लोकांनी शाखेवर हक्क दाखवल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने जोरदार विरोध केला. यावेळी दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या वादाची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र हा प्रश्न अधिकच चिघळला.

एकूणच आता प्रत्येकाच गोष्टीवरुन ठाकरे आणि शिंदे गट आमोरासमोर येत आहे, त्यामुळे आता शिवसेना कोणाची ? हा प्रश्न कधी सुटेल हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.