शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा हल्लाबोल…!

शिवसेना कोणाची ? शिंदेंची का ठाकरेंची या वादावर तूर्तास तरी निवडणूक आयोगाने स्वल्पविराम लावला आहे, आणि दोन्ही गटांना दोन वेगवेगळी नावे आणि चिन्हे दिली आहेत. त्यात ठाकरे गटाला चुनाव चिन्ह म्हणून मशाल मिळाली आहे, तर शिंदे गटाला ढाल आणि तलवार तसेच ठाकरे गटाला ‘शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे लांबलचक नाव मिळाले आहे, तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे. “आम्हाला चिन्हाच्या स्वरूपात साक्षात शिवाजी महाराजांचा आशीर्वाद लाभला आहे.” असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले आहे.
शिवसेनेला पहिली सत्ता मिळवून दिली ती ठाण्याने, त्यावेळी शिवसेनेचे चिन्ह होते ते ढाल – तलवार आणि हेच चिन्ह आम्हांला मिळाले असे आहे नरेश म्हस्के म्हणाले. यापुढे त्यांनी ठाकरे गटावरही शरसंधान केले.
ठाकरे गटाला मिळालेले मशाल हे चिन्ह १९८५च्या निवडणुकीत तेव्हाचे शिवसेनेचे उमेदवार असलेल्या छगन भुजबळ यांना मिळाले होते, आणि ते ती निवडणूक जिंकले होते. हे मशाल चिन्ह आपल्याला कसे मिळाले आणि आपण ही निवडणूक कशी जिंकलो हे भुजबळ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे. याचबरोबर भुजबळांनी असा विश्वासही व्यक्त केला आहे की ठाकरे गट ही अंधेरीची विधानसभा पोटनिवडणूक नक्की जिंकेल. मात्र शिंदे गटाचा विश्वास आहे कि त्यांना बाळासाहेबांचे नाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मिळाल्याने विजय त्यांचाच असेल.
एकूणच ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सामना चुरशीचा आहे. अंधेरी निवडणूकीत काय होते ? तसेच चिन्ह गोठवण्यााचा आणि नाव गोठवण्याचा निर्णय हा केवळ अंधेरी निवडणूकीपर्यंतच राहील का त्यापुढे देखील निवडणूक आयोग याच निर्णयावर ठाम असेल हे बघणे मात्र आता महत्वाचे ठरणार आहे.
