शरद पवार गटाला धक्का; बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

अजित पवारांनी आमदारांसह बंड केल्याने आधीच खिळखिळ्या झालेल्या शरद पवारांच्या गटाला आणखी एक धक्का बसला आहे. कर्जतचे माजी आमदार पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नागपूरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे.

शरद पवार गटाचे माजी आमदार सुरेश लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. शनिवारी नागपूरमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होईल. लाड हे कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल.

कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे एकेकाळी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, अलिकडे त्यांच्यातील हा स्नेह कमी झाला होता. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केली होती.

मात्र, काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला होता. अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत हातमिळवणी केली. एवढ्या मोठ्या राजकीय भूकंपानंतरही सुरेश लाड हे तटकरे यांच्या बरोबर न राहता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर राहिले होते.लाड यांच्यासोबत अनेक नगरसेवक, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे काही सदस्य हेदेखील पक्षप्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती आहे.