नागपुरात होणार विस्तारित विभागीय क्रीडा संकुल – मंत्री संजय बनसोडे

विविध क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विभागातील खेळाडू घडावेत, त्यांना विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात यासाठी दक्षिण –पश्चिम नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने विस्तारित विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय व जिल्हा क्रीडा संकुल आणि नागपूर जिल्ह्यातील विविध क्रीडाविषयक बाबींची आढावा बैठक पार पडली. बैठकीला विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, युवक व क्रीडा महासंचालनालयाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, उपसचिव सुनील हंजे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व माजी आमदार सुधाकर कोहळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोराडी येथे अत्याधुनिक तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येत असून, त्याचे बांधकाम मानंकांनुसार होत नसल्याच्या बाबी निदर्शनास येत असून, येथील बांधकामाच्या गुणवत्तेत कोणतीही कमतरता राहता कामा नये, चांगल्या सोयीसुविधा मिळाल्यास नागपूर विभागातून अजूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देशाचा नावलौकीक कमवतील, असा विश्वास क्रीडामंत्र्यांनी व्यक्त केला.

तालुका क्रीडा संकुलाचे काम वेगाने पूर्ण करून ते खेळाडूंना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगून, विभागीय क्रीडा संकुलामध्ये ज्या क्रीडा प्रकारांचे कोर्ट, हॉल, यासह विविध सोयीसुविधा नाहीत, त्या विस्तारित क्रीडा संकुलात उभारण्यात येतील. तसे प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश संबंधित विभागाला त्यांनी दिले.