मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासमवेत डान्सप्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस चौकशीतून सलिम कुत्तासमवेत झालेली डान्स पार्टी आणि त्या पार्टीला सुधाकर बडगुजर हजर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे बडगुजर यांचे पाय आणखी खोलात गेले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने उबाठा गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. डिसेंबर २०२३ मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांचा सलिम कुत्तासोबत डान्स करताचा व्हिडीओ दाखवला होता. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत बडगुजर यांचे नेमके काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
सलिम कुत्ता पार्टी प्रकरणावरून बडगुजर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. पुढे हे प्रकरण अधिकच चर्चेत आले. अशात एसीबीने काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या एका प्रकरणात बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता मुबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता बरोबर पार्टी केल्या प्रकरणी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलाम अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याची चर्चा आहे.
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुधाकर बडगुजर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला होता. गुन्हे शाखेने चौकशी करुन अहवाल आयुक्तांना दिला. त्या अहवालानुसार सलिम कुत्तासमवेत झालेली डान्स पार्टीत सुधाकर बडगुजर उपस्थित होते. त्यानंतर बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच सलिम कुत्ता उर्फ मोहमंद सलीम मीरा मोईद्दीन शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
