राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत असून एप्रिल आणि मे महीन्यात प्रचारसेभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणुन पालिकेकडे राजकीय पक्षांचे अर्ज यायला सुरूवात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी शिवाजी पार्कवर शक्तीप्रदर्शन करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. एप्रिल आणि मे महीन्यात प्रचारसेभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे पालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी १६ , १९ , २१ एप्रिल सभा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणुन शिवसेनेने अर्ज केला आहे.
त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुद्धा २२, २४, २७ एप्रिल रोजी प्रचार सभेला मैदान मिळावे म्हणुन अर्ज करण्यात आला आहे. तर भारतीय जनता पक्षाने २३, २६, २८ एप्रिलला शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, शिवाजी पार्कवरील सभेवरुन मनसे- ठाकरे गटात संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी १७ मे रोजी मैदान मिळावे म्हणून अर्ज करण्यात आला आहे. त्याचदिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुद्धा मैदान मिळावे म्हणुन पालिकेला अर्ज करण्यात आला आहे. सोबतच शिंदे गटाने १२ ऑक्टोंबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठीही अर्ज करुन ठेवला आहे.
