शरद पवार यांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा भाजपमध्ये; रवी राणा यांच्या विधानाने मोठी खळबळ

अमरावती मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या चुकीबद्दल मतदारांची माफी मागितली. यंदा ही चूक दुरुस्त करा, मी सुद्धा पुन्हा अशी चूक करणार नाही अशी ग्वाही त्यांनी अमरावतीकरांना दिली. त्यांच्या भाषणाचा सगळा रोख महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे होता. शरद पवारांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली असतानाच नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या. पवार साहेबांच्या मनात भाजपाच आहे. त्यांनीच अजित पवारांना भाजपमध्ये पाठवलं. फक्त सुप्रियाताईंच्या हट्टामुळे त्यांना थांबावं लागलं, असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केला.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आमदार रवी राणा म्हणाले की, संजय राऊत हे नाचोळे आहेत, काँग्रेसच्या आणि सोनिया गांधीच्या दरबारात ते नाचतात. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी भाजपसोबत बेईमानी केली. अमरावतीमध्ये हिंदुत्वाला डिवचण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहे. उद्धव ठाकरेंचं खोट हिंदुत्व उघडं पडलं आहे.

यावेळी त्यांनी बच्चू कडू यांच्यावरही टीका केली. बच्चू कडू हे मीडियाप्रेमी आहेत. मीडियामध्ये राहण्याची त्यांना सवय आहे. मोठ्या माणसाला विरोध करणे आणि टीआरपी मिळवणे त्यांना आवडते. मैदानासाठी आम्ही परवानगी मागितली. सर्व परवानगी आमच्याजवळ आहे. बच्चू कडू हे हिंदुत्वाच्या विचाराचा विरोध करतात, असा आरोप त्यांनी केला.

अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत शरद पवार यांनी अमरावतीकरांची माफी मागितली,पाच वर्षापूर्वीची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना खासदार केलं.असं शरद पवार म्हणाले होते.