महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निकाल जाहीर केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तर, इतर तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना न्यायालयानं निर्दोष ठरवलेलं आहे.
डॉ. तावडे याचा या गुन्ह्यात हेतू दिसून आलेला आहे. तसेच त्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत. तर भावे आणि पुनावळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या तीनही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, विशेष न्यायाधीशांनी निकालात म्हटले. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले आहे.
फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. दोषी ठरवण्यात आलेले सचिन अणदुरे आणि शरद कळसकर हे खुनाच्या 302 कलमातंर्गत दोषी ठरले. त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा झालीय. 5 लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. सबळ पुराव्याअभावी तिघे जण निर्दोष सुटणं हे सीबीआयचं अपयश मानलं जातंय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी 7.15 च्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी डॉ. दाभोलकरांच्या छातीत, तर दुसरी डोक्यात लागली होती. दाभोलकरांच्या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती.
15 सप्टेंबर 2021 रोजी पुणे स्पेशन कोर्टाने दाभोलकर हत्या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित केला. डॉ. वीरेंद्र सिंह तावड़े, सचिन अंदुरे, शरद कालस्कर आणि विक्रम भावे याच्यावर हत्या, हत्येचा कट रचणे आणि शस्त्रास्त्र कायद्याशी संबंधित कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. याशिवाय संजीव पुनालेकर याला पुरावे नष्ट करणे आणि चुकीची माहिती देण्यासाठी आयपीसी कलम 201 अंतर्गत आरोप करण्यात आले.
