अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात हैदराबादेत गुन्हा दाखल करण्यात आला. राणा यांच्या वक्तव्यामुळे ही कारवाई करण्यात आली. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी हैदराबादेत नवनीत यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा ओवैसी बंधूना ओपन चॅलेंज दिले असून ‘ओवेसींसारखे खुंखार आम्ही घराबाहेर पाळून ठेवतो,’ असते वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा यांनी ओवेसी बंधूंबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर, एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे देखील त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. अकबरुद्दीन ओवेसी यांच्या दहा वर्षांपूर्वीच्या ‘१५ मिनिटांसाठी पोलीस हटवा,’ या संदर्भातील वक्तव्यावर नवनित राणा यांनी प्रत्युत्तर देत ‘१५ सेकंडसाठी पोलीस हटवा मग दोन्ही भावांना कुठे पळावं हे समजणार नाही,’ असे वक्तव्य केले होते. त्यावरून आता, नवनीत राणा आणि ओवेसींमध्ये खडाजंगी सुरु झाली आहे.
गुन्ह्याला घाबरत नाही : नवनीत राणा
ओवेसी यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, मी गुन्ह्याला घाबरत नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या. अशा गुन्ह्यांना नवनीत राणा मोजत नाही. ज्या देशामध्ये सव्वाशे कोटींपेक्षा जास्त आमची लोकसंख्या आहे तिथे १५ कोटी असलेले लोक खुलेआमपणे धमकी देतात १५ मिनिटे पोलिसांना बाजूला करा. आम्ही १५ मिनिटांत पाहून घेऊ कोणामध्ये दम आहे. उघडपणे धमकी देणाऱ्या लोकांना उत्तर तर द्यावेच लागेल. ते उत्तर मी दिलं आणि त्यांनी १५ मिनिटे मागितली होती मी १५ सेकंद मागितले आहेत. सव्वाशे कोटी लोकसंख्या असताना घाबरायला आम्ही बांगड्या थोडी घातल्या आहेत. आमचे संस्कार, संस्कृती आमच्या पाठीशी आहे. आम्ही त्यानुसार काम करतो. पण या लोकांनी जर मंचावर येऊन दम देत असतील तर आम्ही काय बांगड्या घालून बसलेलो नाही. माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर ओवेसींवर १०० टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी काही गुन्हा दाखल होण्याला घाबरणारी नाही. असं नवनीत राणा म्हणाल्या.
माझा उद्देश स्पष्ट आहे. हिंदूस्थानमध्ये हिंदू विचारधारेला धरुन लोक राहतात त्याच्यावर जर कोण बोललं तर त्याला उत्तर द्यायला सक्षम आहे, असं राणा म्हणाल्या. ओवेसींच्या आव्हानाला मी मोजत नाही. ते म्हणतात छोटा खूंखार आहे,पण असे खूंखार आम्ही घराच्या बाहेर पाळून ठेवतो, आता काय ते समजून घ्या, असं म्हणत नवनीत राणा यांनी ओवेसी बंधूंना ओपन चॅलेंज दिलं आहे. तर, बच्चू कडू यांच्यासंदर्भात विचारलं असता तोडी बहाद्दर लोकांवर मी बोलत नाही, असं नवनीत राणा यांनी म्हटलं.
