पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात सरकारवर दबाव वाढला आहे. आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप होतोय. आरोपी एका बड्या व्यावसायिकाचा मुलगा आहे. शनिवारी रात्री पुण्यात कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात पोर्शे कार चालवणाऱ्या आरोपीने एका दुचाकीला उडवलं. यात दुचाकीवरील अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिसांवर सुद्धा काही आरोप झाले. यावर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तर दिली.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आले आहेत. तीन आरोपींना सोमवारी अटक केलीय. तर अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस पहिल्या दिवसापासून काम करत आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनीही फोन करून अपघाताबाबत माहिती दिली होती. पोलिसांच्या भूमिकेवर अनेकदा शंका व्यक्त केली गेली. पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही झाला. हा आरोप पुणे पोलीस आयुक्तांनी फेटाळून लावला.
या प्रकरणात जे दोन जीव गेले त्यांना न्याय निळावा यासाठी पुर्णपणे तपास सुरू आहे. यामध्ये कुणाचाही आमच्यावर दबाव नव्हता, नाही आणि कधीच नसेल अशी प्रतिक्रिा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. तसंच, दुर्देवाने कोर्टाने आमचे काही अर्ज फेटाळले अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र, पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आम्ही आमचं कर्तव्य बजाबत असतो. आम्हाला कुणाचा दबाव असल्याचं काही कारण नाही असंही ते म्हणाले.
‘ब्लड रिपोर्टची वाट पाहतोय’
“कोणताही निगेटिव्ह ब्लड रिपोर्ट आलेला नाही. ब्लड रिपोर्ट पाठवण्यात आला आहे. ब्लडचे रिपोर्ट आम्हाला अद्याप प्राप्त झालेले नाहीत. दोन ठिकाणी ब्लड सँपल घेण्यात आले आहेत जेणेकरुन संभ्रम राहू नये. जी काही वस्तुस्थिती असेल ती ब्लड रिपोर्टमधून समोर येईल. त्याबाबत संभ्रम असण्याचं कारण नाही. पुराव्यांच्या दृष्टीकोनातून आरोपी सीसीटीव्हीत मद्यप्राशन करताना दिसत आहे. त्याने एके ठिकाणी ऑनलाइन पेमेंट केलं आहे. त्याची बिलंही आहेत. पुराव्यांनुसार ते दारु प्यायले असून, ब्लड रिपोर्टनंतर त्याबाबत खुलासा होईल,” असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट सांगितलं आहे.
