जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये राज्यातील चार संस्थांनी पहिल्या एक हजार संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यात आयआयटी मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाने गेल्यावर्षीच्या कामगिरीत सुधारणा करत स्थान उंचावले आहे. क्वॅकेरली सायमंड्सतर्फे ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. नियोक्ता प्रतिष्ठा, शैक्षणिक प्रतिष्ठा, विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, रोजगार परिणाम, शाश्वतता, आंतरराष्ट्रीय संशोधन अशा निकषांवर उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले.
2024 च्या क्रमवारीत 149 व्या स्थानी असलेल्या आयआयटी मुंबईने आता 118 वे स्थान मिळवले आहे. आयआयटी दिल्ली 150 व्या स्थानी आहे. बेंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) 211 व्या, आयआयटी मद्रास 227 व्या, आयआयटी कानपूर 263 व्या, दिल्ली विद्यापीठ 328 व्या स्थानी आहे.
राज्यातील आयआयटी मुंबईसह एकूण चार संस्थांनी या यादीत स्थान प्राप्त केले. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. 2024 मध्ये 711 ते 720 या गटात असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 631 ते 640 या गटात स्थान मिळवले. त्या खालोखाल सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाने 641 ते 650 या गटात स्थान प्राप्त केले. गेल्यावर्षी 751 ते 760 या गटात असलेल्या मुंबई विद्यापीठानेही कामगिरी उंचावत यंदा 711 ते 720 या गटात जागा मिळवली आहे.
दिल्ली विद्यापीठ (डीयू) आपल्या पदवीधरांच्या रोजगारक्षमतेसाठी ओळखले जाते. तर रोजगार देण्यात या विद्यापीठाचा जागतिक स्तरावर 44 व्या क्रमांक आहे. या यादीत 61 टक्के भारतीय विद्यापीठांनी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. तर 24 टक्के विद्यापीठांनी आपले स्थान कायम राखले आहे, 9 टक्के विद्यापीठे क्रमवारीत घसरली आहेत तर तीन विद्यापीठे क्रमवारीत नव्याने दाखल झाली आहेत. तब्बल 37 भारतीय विद्यापीठांनी प्रति विद्याशाखा प्रशस्तिपत्रकांमध्ये सुधारित कामगिरी केली आहे.
