रामदास कदम म्हणाले, २०८० पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहिले तरी चालेल

विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत तणाव असल्याच्या चर्चा विरोधकांकडून रंगविल्या जात असताना, शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी ठाम भूमिका मांडली आहे. “२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले तरीही आमची काही अडचण नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, यावरून काेणीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्यात मतभेद हाेणार नाहीत. ( Ramdas Kadam said it would be fine if Fadnavis remained Chief Minister till 2080)

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विक्रमी यश मिळाले. भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. मात्र, त्यानंतर शपथविधीपासून मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत महायुतीत पदांच्या वाटपावरून नाराजी आणि असंतोष दिसून आला. पालकमंत्रीपदावरूनही मतभेद उघड झाले. त्यामुळे घटक पक्षांमध्ये कुरघोडीची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “विकसित महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद अत्यावश्यक आहे. ते २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहतील. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते.

या वक्तव्याला प्रतिसाद देताना रामदास कदम म्हणाले, “फडणवीस, बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही सर्व एकत्र आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद होणार नाहीत.”

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली. यावरून श्रेयवादाच्या चर्चा सुरू झाल्या. यावर बावनकुळे म्हणाले, “पर्यटकांचे रक्षण करण्याच्या प्रयत्नाला जर कुणी श्रेयवाद म्हणत असेल, तर ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. अशा प्रसंगी राजकारण टाळायला हवे.”