महावितरणच्या मोबाईल अँपला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्युत ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन घेण्यापासून बिल भरणे, तक्रारी नोंदविणे आणि वीजचोरीची खबर देणे अशा विविध सुविधा असलेल्या महावितरणच्या मोबाईल अँपला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून मोबाईलमध्ये अँप डाऊनलोड करण्याची संख्या ५० लाखांपेक्षा अधिक झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या ‘महावितरण’ने जवळपास सर्वच ग्राहक सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत. या सर्व सेवा ‘महावितरण’ मोबाईलवर उपलब्ध करून दिल्या आहेत. विजेसंबंधीच्या सेवा ग्राहकांना सहजरीत्या उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून ‘महावितरण’च्याच माहिती तंत्रज्ञान विभागाने ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल ॲप विकसित केले आहेत.

राज्यात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी हे ॲप आहे. एकापेक्षा जास्त वीज कनेक्शन असतील तर ते एकाच खात्यातून हाताळता येतात. विजेसंबंधीच्या सर्व प्रकारच्या तक्रारी नोंदविणे तसेच त्याची सोडवणूक झाली की नाही, याची खातरजमा करता येते. यापुढे ग्राहकांना मोबाईलवर वीजबिलाचे संदेश पाठवले जातात.

त्यासाठी ग्राहकांना त्यांचे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नोंदविण्याची व ते अद्यावत करण्याची सुविधा या ॲपमध्ये आहे. ज्या ग्राहकांचे रीडिंग महावितरणला मिळालेले नाही, अशा ग्राहकांना कंपनीकडून नोंदविलेल्या मोबाईलवर संदेश जातात. यामुळे वीजबिलांमधील चुका कमी होऊन ग्राहक तक्रारीही कमी होतात. नोव्हेंबर २०२२ या महिन्यात महावितरणच्या घरगुती ग्राहकांनी एकूण २१०४ कोटी रुपयांची बिले विविध माध्यमातन ऑनलाईन भरली होती. त्यापैकी मोबाईल अँपवरून २३७ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली.