अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार फुटून सत्ताधारी आघाडीत

विशेष प्रतिनिधी

कोहिमा (नागालँड) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नागालँडमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे सात आमदार थेट मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) मध्ये विलीन झाले आहेत. ( Big blow to Ajit Pawar groupSeven NCP MLAs split and join ruling alliance)

सोमवारी संध्याकाळी या सात आमदारांनी आपले अधिकृत विलिनीकरणाचे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले. अध्यक्षांनी त्याला मान्यता दिली आणि दहाव्या अनुसूचीनुसार या विलिनीकरणाला वैधतेची मोहोर उमटवली. विलीन झालेल्या आमदारांमध्ये नामरी नचांग, के. ए. पोंगशी फोम, पिक्टो शोहे, वाय म्होनबेमो हम्त्सो, वाय मनखाओ कोन्याक आणि के. एस. तोइहो येप्थो यांचा समावेश आहे.

या घडामोडीमुळे NDPP चे विधिमंडळातील संख्याबळ २५ वरून ३२ वर पोहोचले आहे. नागालँड विधानसभेत एकूण ६० सदस्य आहेत. त्यामुळे आता सत्ताधारी आघाडी अधिक मजबूत झाली आहे. NDPP प्रवक्ते केन्ये यांनी सांगितले की, “या विलिनीकरणामुळे सरकारची स्थिरता अधिक बळकट झाली आहे आणि भविष्यातील कोणताही राजकीय धोका आता दूर झाला आहे.”

२०२३ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये आश्चर्यकारक यश मिळवत १२ जागा जिंकल्या होत्या. त्या वेळी NDPP व भाजपच्या पाठोपाठ राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या सर्व आमदारांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा अधिकृतपणे दर्शवला होता.