डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे: पुण्यातील वानवडी परिसरातील साळुंखे विहार रोडवरील जश्न हॉटेल येथे अवैधरित्या सुरू असलेला हुक्का बार पोलिसांनी उध्वस्त केला. ही कारवाई २६ ऑक्टोबर रोजी वानवडी पोलिसांनी केली असून, हॉटेलमधून तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का साहित्य आणि बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
( Police raid Jashn Hotel in Wanawadi which was running an illegal hookah bar)
या प्रकरणी पोलिसांनी महमंद साले साक्री (वय ४१, रा. मॉर्वल शांग्रिला बिल्डिंग, उंड्री ) या हॉटेल चालकासह आणखी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का पुरवून हुक्का बार चालवीत होते तसेच विना परवाना बिअरच्या बाटल्या जवळ बाळगत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात कारवाई सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा (COTPA) २०१८ मधील कलम ४-अ, २१-अ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ड) अंतर्गत करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार यतीन भोसले यांनी तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, अवैध हुक्का बार आणि विना परवाना दारू विक्रीविरोधात मोहीम सुरू असून, अशा हॉटेल आणि लॉजेसवर सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणाऱ्या अशा ठिकाणांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
