लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा आरोपी अटकेत, मॅट्रिमोनियल वेबसाईटवर खोट्या ओळखीने महिलांची फसवणूक

डीसीएन न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड: लग्नाचे आमिष दाखवून एका घटस्फोटीत महिलेशी फसवणूक व जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणारा आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली. दिल्‍ली येथे ही कारवाई करण्‍यात आली आहे. ( Accused of torturing women on the pretext of marriage arrested defrauding women with false identities on matrimonial websites)

आलोक अजयकुमार पुरोहित (वय ४३, रा. एफ-१०० मेजर शैतानसिंग कॉलनी, शास्त्रीनगर, जयपूर) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपीने विविध विवाह वेबसाईटवर खोट्या ओळखीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचेही तपासात समोर आले आहे.
वाकड पोलिस ठाण्यात पीडित महिलेने २७ सप्टेंबर २०२५ रोजी फिर्याद दिली होती. आलोक पुरोहित याने Jeevansathi.com, Shaadi.com आणि IITMshadi.com या विवाह वेबसाईटवर स्वतःला अविवाहित दाखवून फिर्यादी महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करत पुण्यात येऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.
यानंतर आरोपीने फिर्यादीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून तिला धमक्या देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. “तक्रार केल्यास फोटो सोशल मीडियावर प्रसारित करीन,” अशी धमकी देत आरोपीने तिचा मानसिक छळ केला होता. पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीस अटक केली.
तपासादरम्यान आलोक पुरोहित विवाहित असल्याचे समोर आले असून, तो विविध मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मवर खोट्या माहितीच्या आधारे महिलांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. फिर्यादी व्यतिरिक्त इतर महिलांनाही आरोपीने अशाच प्रकारे फसविल्याची माहिती मिळाली असून, या प्रकरणाचा पुढील संत तुकाराम नगर पोलिस ठाण्‍याच्‍या वरिष्‍ठ निरीक्षक वनिता धुमाळ या करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *