आपणास काँग्रेस मधून बाहेर ढकलण्याचे तसेच आपले मामा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना राजकीयदृष्या अडचणीत आणण्याचे षडयंत्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून रचले गेल्याचा आरोप नाशिक पदवीधरचे विजयी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेनी केला आहे. त्यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून अनेक दिवसापासून आरोप होत होते. त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारल्यावर ते लवकरच भूमिका स्पष्ट करू असे सांगत होते. त्यामुळे उत्कंठा लागलेल्या पत्रकार परिषद त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.
सत्यजित तांबे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, या निवडणुकीत अनेक आरोप-प्रत्यारोप आमच्या परिवारावर करण्यात आले. २०३० ला आमच्या परिवाराला काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी १०० वर्ष पूर्ण होतायत. ह्या दरम्यानच्या काळात खूप निष्ठेने आम्ही पक्षासाठी काम केले. मी २००० साली विद्यार्थी चळवळीतून काँग्रेस पक्षात कामाला सुरवात केली. २००७ ते २०१७ ही दहा वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजीव सातव यांनी मला युवक काँग्रेस मध्ये आणले. २०२२ पर्यंत मी युवक काँग्रेससाठी काम केले. २०१८ मध्ये जेव्हा मी युवक कॉँग्रेसचा अध्यक्ष झालो तेव्हा राज्यात कॉँग्रेसची स्थिती वाईट होती. तेव्हा चांदयापासून बांदा असे संघटन बांधणीचे काम केले. युवक काँग्रेसमध्ये २२ वर्षे प्रामाणिक काम केले.
२०१९ ला काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यावर मी पहिला कार्यकर्त्या होता. जो पक्षाला नवी उभारी देण्यासाठी काम हाती घेतले होते, बैठका घेतल्या. त्याच कामाचे फळ म्हणजे काँग्रेसच्या विधानसभेच्या ४४ पैकी २८ जागा आम्ही जिंकू शकलो. यात युवक कॉँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. माझ्यावर महाराष्ट्रातील विविध आंदोलनाच्या ५० पेक्षा जास्त केसेस होत्या, त्यापायी पासपोर्ट मला मिळत नव्हता. चळवळीतून येऊन प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करणारा मी नेता आहे. युवक काँग्रेसचे पद गेल्यावर पक्षाच्या प्रथेनुसार विधानपरिषद किंवा राज्यसभा (कामाच्या पातळीनुसार) देण्याची प्रथा असते ते अपेक्षित असते, मात्र माझ्यासोबत तसे झाले नाही. काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांना संधी बद्दल बोललो असताना त्यांनी वडिलांच्या जागेवर लढण्यासाठी सांगितले, हे माझ्यासाठी संतापजनक होते. मी त्यांना हा विचार वाढण्यासाठी, संघटना वाढण्यासाठी जे काम केले त्यांचा मोबदला म्हणून काही द्यावे असे स्पष्टपणे सांगितले होते.
मागील काही दिवसापूर्वी मी स्वतः काहीतरी करायचे ठरवले, एखाद्या नवीन मतदारसंघात काम करायचं ह्या भूमिकेत होतो. काही दिवसापूर्वी पुस्तक प्रकाशन सोहळा झाला. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना मी बोलवले. त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, “सत्यजितला संधी द्या नाहीतर आमचा त्यावर डोळा आहे.” त्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरु झाली. या वाक्यावर मोठा प्रतिसाद सभागृहात मिळाला. ह्यामागे जनसामन्याची भावना होती.
देवेंद्र फडणवीस हे मला मोठ्या भावासारखे आहे, त्यांच्याशी जिव्हाळ्यांचे संबंध असून ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. उमेदवारीची वडिलांसोबत आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केल्यानंतर भूमिका ठरवली.मला औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक मतदार संघाचा एबी फॉर्म देण्यात आला. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची सही आहे. भाजपच्या उमेदवारीवरून आरोप करण्यात आले. मला भाजपची उमेदवारी पाहिजे असती तर मी चुकीचे एबी फॉर्म आले म्हणून कळवले नसते. याआधी प्रभारींशी चर्चा झाल्यानंतर माझा एबी अर्ज घेण्यासाठी प्रतिनिधी १० जानेवारीला सकाळी नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्षांकडे पोहोचला. त्यास संध्याकाळपर्यंत म्हणजे १० तास बसवून ठेवले गेले. उशिराने पाकिटात दिलेले दोन कोरे एबी अर्ज वेगळ्याच मतदारसंघाचे असल्याचे लक्षात आले. याची कल्पना दिल्यावर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाने एबी अर्ज दिला. त्यात पर्यायी उमेदवारासाठी असलेल्या रकान्यात निरंक शेरा मारलेला होता. म्हणजे दुसरा उमेदवार देऊ शकत नाही असे स्पष्ट होते. माझा प्रश्न हा आहे काँग्रेस पक्ष प्रदेश काँग्रेसवर काही कारवाई करणार आहे का? माझा स्पष्ट आरोप आहे आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचले गेले. हे सर्व स्क्रिपटेड होते. त्या स्क्रिप्टचा पार्ट म्हणून माझ्या माणसांना बोलवले. १० ते १२ तास बसून ठेवले, बंद पॉकेट मध्ये चुकीचे फॉर्म दिले.
मी काँग्रेस पक्षातील नेत्याच्या पत्रकार परिषदेत ऐकले उमेदवारीचा निर्णय तर तांबे परिवाराला घ्यायचा होता. मात्र, सत्यजितला तिकीट द्या ही वडिलांची भूमिका असताना वडिलांना उमेदवारी का देण्यात आली? महाराष्ट्रातील एकही विधानपरिषदेचा उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही. मग माझीच उमेदवारी दिल्लीतून का जाहीर झाली? हा सर्व षडयंत्रचा पार्ट आहे. खरतर ही स्क्रिपटेड स्टोरी बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी होती. सत्यजित तांबेला उमेदवारी मिळू नये यासाठी होती. मी फॉर्म भरण्याच्या दिवशी एच.के.पाटलांना वारंवार फोन करत होतो, त्यांनी माझे फोन घेतले नाही. नाना पटोले यांचा फोन बंद होता. बाळासाहेब थोरात ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये होते. अशा स्थितीतही आपण काँग्रेसकडूनच अर्ज भरला पण एबी अर्ज नसल्याने तो अपक्ष उमेदवारीत परावर्तित झाला. महाविकास आघाडीकडे पाठिंबा जाहीर करण्याची मागणी केली. सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळी दिल्लीतून जाहीर माफीनामा मागण्यास सांगण्यात आले. ती मागण्याचीही तयारी दर्शविली. १९ जानेवारी रोजी सहप्रभारींना पत्रही दिले. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अन्य उमेदवारांना पाठिंबा देणार, तांबे परिवाराने धोका दिला, असे आरोप करीत होते. एका बाजूला दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा सुरू असताना प्रदेश नेतृत्वाकडून दुसरीच चाल खेळली गेली.
पुढे बोलताना तांबे म्हणाले, एका बाजूला राहुल गांधी नफरत छोड़ो भारत जोडो म्हणतात, प्रेमाने लोक जोडा म्हणतात. मात्र राज्यातल्या काही नेत्यांनी अक्षरशः द्वेषापोटी आमच्या कुटुंबाला बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला जे जाहीररित्या झाले ते सांगतो. खाजगी बैठकात फोन कॉल्स वरती बोलल्या गेलेल्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, मात्र पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी काही करणार नाही. काँग्रेस पक्षाने हाथ से हाथ जोडो उपक्रम सुरु केला म्हणताय. जोपर्यंत पेर से पेर अटकाने का काम चलेगा. तोपर्यंत हाथ से हाथ जोडणे से कुछ नहीं होगा, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. काँग्रेस पक्षातील नेत्यांना एका युवकाला कसे डांबून ठेवता येईल, बाळासाहेब थोरातांना कशा पद्धतीने अडचणीत आणता येईल. यासाठी हे मोठं षडयंत्र आखलं गेले. ही निवडणूक त्याचा एक भाग होती.
सत्यजित तांबे यांनी स्वतःची भूमिका मांडताना सांगितले, मी अपक्ष आहे, यापुढे अपक्ष राहणार.आम्ही आजपर्यंत एक गोष्ट नेहमीच पाळली आहे. कोणतीही पक्षाअंतर्गत घटना ही सार्वजनिक ठिकाणी मांडायची नाही, ती पक्षाअंतर्गतच सोडायची. मात्र, काँग्रेसच्या वतीने तांबे कुटूंबानी फसवले, धोका दिला असे आरोप करण्यात आले म्हणून आज सार्वजनिक रित्या ह्या गोष्टी मांडत आहे. सामान्य माणसाच्या मनात गैरसमज निर्माण होत होते. माझ्याकडे दुसरा पर्याय राहिला नसल्याने नाइलाजने हा घटनाप्रकार आपल्या समोर मांडला आहे. खरतर मला या विषयावर पुढे बोलायला आवडणार नाही.
