कसब्यात काँग्रेसचं टेंशन वाढलं ; इच्छुकांकडून बंडखोरीचा इशारा

विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मात्र काँग्रेससमोर उमेदवार निश्चित करण्याचं मोठं आव्हान आहे. कारण काँग्रेसच्या इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीचा इशारा दिला आहे.

काँग्रेसचे इच्छुक उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. आपण पक्षात गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत आहोत. पण तरीही पक्षाने आपला विचार केला नाही, या भावनेने बाळासाहेब दाभेकर नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविरोधात जावून कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचा फटका काँग्रेसला पोटनिवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा राहावा यासाठी महाविकास आघाडीतील तीनही मोठ्या घटक पक्षांनी दावा केला होता. शिवसेना पिंपरी चिंचवड जागेसाठी प्रचंड आग्रही होती. पण राष्ट्रवादीलादेखील तीच जागा हवी होती.काँग्रेस कसबा पेठच्या जागेसाठी आग्रही होती. राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवडची जागा हवीच होती. जागा वाटपावरुन तीनही पक्षांमध्ये चर्चा झाली. अखरे चर्चेअंती शिवसेनेने माघार घेत राष्ट्रवादीसाठी पिंपरी चिंचवडची जागा सोडली.