
गेल्या काही तकाळापासून महाराष्ट्रात सुरु असेलल्या राजकीय खेळीमध्ये आणखी एक वळण आलेले आहे. आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावर माजी कमिश्नर परमबीर सिंह यांनी १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. अनिल देशमुख यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची येत्या १५ दिवसात चौकशी करण्यात यावी असे निर्देश दिले होते. आणि त्यानंतर लगेचच अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठले आहे.
उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे १५ दिवसांच्या आत सीबीआयला रिपोर्ट द्यावा आणि या रिपोर्टच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच एफआयआर दाखल करण्यात येईल. या पार्श्वभूमिवर अनिल देशमुख यांनी आज राजीनामा दिला आहे. उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे कि हे एक अभूतपूर्व असे प्रकरण आहे, ज्यामध्ये खुद्द पोलिस आयुक्तांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत.
या संदर्भात केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रेसवार्ता घेत उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हणले आहे कि, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य करण्याची नैतिकता गमावली आहे. ज्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यात हे सर्व घडतंय त्यांनी देखील राजीनामा द्यायला हवा.” एकूणच हे प्रकरण बाहेर आल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रकारचे राजकीय वादळ आले आहे.
परमबीर सिंह यांच्या ‘लेटर बॉम्ब’ ने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. या पत्रात त्यांनी लिहीले आहे कि, “राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडून मुंबईतील विविध बार मधून १०० कोटी रुपयांची वसूली करण्याचे आदेश दिले होते.” हे अतिशय धक्कादायक विधान होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र अनिल देशमुख यांना वाचवण्याचा आतोनात प्रयत्न केला, मात्र ते काही यशस्वी होऊ शकले नाही. आज शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख आदि उपस्थित होते, या बैठकीत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रात आजच्या घडीला देशातील सर्वाधिक कोरोना पेशंट्स आढळताएत. एकूणच महाराष्ट्राची स्थिती या कोरोना मुळे प्रचंड खराब झाली आहे, त्यातून यावेळी राज्याला या गर्तातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे तर सरकारच्या मोठ्या नेत्यांवर ते ही गृहमंत्री सारख्या पदावर भ्रष्टाचाराचे आरोप लागताएत, यातून एकूणच महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती सध्या काय असेल हे लक्षात येते. आता या विषयी पुढे काय होते ? हे सरकार स्थिर सरकार राहील का ? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
