एकनाथ शिंदे पक्षप्रमुखपद स्विकारणार? मुंबईत आज शिंदे गटाची महत्त्वाची बैठक

एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असतांना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी धाव घेतली आहे. त्यात दुसरीकडे मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राज्य कार्यकरिणीतील नेते, आमदार, खासदार आणि इतर प्रमुख नेतेही उपस्थित असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मार्गदर्शन करणार आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच शिंदे गटाच्या शिवसेनेनं सर्वच आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे. मुंबईत हॉटेल ताज येथे सायंकाळी ७.३० वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेता एकनाथ शिंदे हेही बैठकीला हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत काही महत्त्वाचे ठराव घेण्यात येतील. त्यात, शिवसेना पक्षप्रमुखपदी एकनाथ शिंदेंना बसवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे पद स्विकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे संध्याकाळच्या बैठकीनंतरच या सर्व गोष्टींचा उलगडा होईल.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. शुक्रवारी निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील एखनाथ शिंदे यांना मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.