महाराष्ट्रात H3N2 इंन्फ्लूएन्झा विषाणूचे वाढते रुग्ण पाहता राज्य शासन सतर्क झालं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी अत्यंत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये राज्यातील एकंदर परिस्थिती, उपलब्ध उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत चर्चा होऊ शकते. इतकंच नव्हे, तर मास्कसंदर्भातील निर्णयही घेतला जाऊ शकतो असं सांगण्यात येत आहे.
कोरोनानंतर देशावर आता नव्या विषाणूचं संकट आलं आहे. सध्या देशात H3N2 विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्येही या विषाणूने डोकं वर काढलं आहे. मुंबई आणि पुण्यासह इतर महत्वाच्या शहरांमध्ये H3N2 विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत.मार्च महिन्यातील 15 दिवसांत मुंबईमध्ये H3N2 विषाणूच्या 53 रुग्णांची नोंद झाली आहे. तर जानेवारी ते मार्च या 75 दिवसात H3N2 चे 118 रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे बुधवारी राज्यात दोन H3N2 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एक रुग्ण अहमदनगर आणि एक रुग्ण नागपूर येथील आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या पार्श्वभूमीवर महत्वाचं आवाहन केलं आहे. H3N2 मृत्यू होत नाही. तो रूग्ण 2 दिवसांत बरा होतो आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ज्या ठिकाणी असे संशयित रुग्ण आढळून येतील, त्यांच्यावर उपचार केले जातील. आजार अंगावर काढू नका. खबरदारी घ्या. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, अंतर पाळा तसेच मास्क वापरा, असं आवाहन तानाजी सावंत यांनी केलं आहे.
