धोक्याची घंटा! ११७ दिवसांनंतर एका दिवसात ६०० हून अधिक नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्नांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार देशात करोना रुग्णांची दैनंदिन संख्या ११७ दिवसांनंतर ६१८ नोंदली गेली, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,१९७ वर गेली आहे.

२४ तासांच्या कालावधीत पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची एकूण संख्या ५,३०,७८९ वर पोहोचली आहे. कर्नाटकात दोन, महाराष्ट्रात दोन आणि उत्तराखंडमध्ये एका मृत्यूची नोंद झाली आहे.

१८ नोव्हेंबर रोजी एका दिवसात ६५६ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर प्रथमच बुधवारी ६०० च्या वर नोंदली गेली. देशात करोना रुग्णांची एकूण संख्या ४.४६ कोटी असून करोनामुक्त होण्याचा दर ९८.८० टक्के आहे. या आजारातून बरे झालेल्या नागरिकांची संख्या ४ कोटी ४१ लाखवर पोहोचली आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात करोना लशीच्या २२०.६४ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत २२०.६४ कोटी लोकांनी घेतले डोस
आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण ४,४१,५६,९७० लोक कोरोना संसर्गापासून मुक्त झाले आहेत, तर कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.१९ टक्के आहे. रुग्णाच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८. ८० टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार,देशभरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना विरोधी लसीचे २२०.६४ डोस देण्यात आले आहेत.