रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन; मंत्री तानाजी सावंतांची घोषणा

गेल्यावर्षी रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेटचे प्रकरण उघडकीस आले. यापूर्वी पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.याच पार्श्वभूमीवर आता रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेटची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमून तीन महिन्यात याबाबत अहवाल सादर करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली आहे.

धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत रुग्णालयांमध्ये मोफत किंवा पन्नास टक्के सवलतीच्या दरात गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची अनियमितता तपासण्यासाठी लेखा परीक्षकांच्या मार्फत परीक्षण करून अनियमितता आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली. याबाबत आमदार माधुरी मिसाळ यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला सावंत उत्तर देत होते.

यापूर्वी पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. ज्या महिलेची किडनी काढण्यात आली ती महिलाही बनावट कागदपत्रं तयार करुन यात सहभागी असल्याचं आढळून आल्याने तिच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. एकूण 15 जणांच्या विरोधात पुणे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला होता. सारिका सुतार या महिलेने तिची फसवणूक करुन तिची किडनी काढल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. या चौकशीत पोलिसांना सारिका सुतार या महिलेची 15 लाख रुपयांच्या बदल्यात किडनी काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवण्याचे ठरले होते असे आढळले होते.