विरोधकांना फक्त उद्धव ठाकरेंची भिती; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

काल दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा गुढी पाडवा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी जाहीर सभेतून महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तसेच उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंमुळेच एकनाथ शिंदेंसारखे अनेकजण शिवसेनेतून बाहेर पडले, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंना चोख प्रत्यूत्तर दिले आहे. “पक्षाला १८ वर्ष पुर्ण झाली आहेत, आता त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

संजय राऊत म्हणाले राज ठाकरेंचं भाषण मी बघतिलं नाही. सकाळी मी वाचलं. त्यांच्या पक्षाला आता १८ वर्ष झाली आहे. त्यांचा पक्ष वयात आला आहे. त्यांच्या पक्षाचं काय सुरू आहे, मला माहिती नाही. आम्ही फक्त आमच्या पक्षाचा विचार करतो. पण १८ वर्षांनंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलतात. उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत. एकनाथ शिंदे, नारायण राणे, भाजपा, राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंवर बोलत असतात. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंबद्दल सर्वांच्या मनात भीती आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी मनसेवर टीका केली. पक्षाला १८ वर्ष पुर्ण झाली आहेत, पक्ष वयात आला आहे, ते काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्हाला आमची ताकद माहित आहे, क्षमता माहित आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.