बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी द्या, विजय शिवतारेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बारामती तालुक्यातील 69 दुष्काळी गावातील लोकांना जानाई शिरसाई योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्रही शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शिवतारे हे दोन दिवसीय बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांच्या गावभेट दौऱ्यावर होते. मात्र, दौरा करत असतानाच त्यांची मुंबईत बैठक लागल्यामुळं त्यांना जावे लागले. बैठक झाल्यानंतर शिवतारेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत ही मागणी केली.

बारामती तालुक्यातील सुपे, कुतवळवाडी, राजबाग, भोंडवेवाडी, आंबी खुर्द, खंडू खैरवाडी, वढाणे, मांगोबावाडी, चांदगुडेवाडी, दंडवाडी नारोळी, कोळोली, देऊळगाव रसाळ, खोर, उंडवडी सुपे, जराडवाडी, उंडवडी क.प. सोनवडी, सुपे, बऱ्हाणपूर, गोजूबावी, कारखेल, जळगाव सुपे, अंजनगाव, साबळेवाडी या सहित इतर गावे हे जनाई शिरसाई योजनेच्या लाभ क्षेत्रात समाविष्ट आहेत या गावांसाठी तीन पॉईंट 47 टीएमसी पाणी खडकवासला धरण शृंखलेत राखीव आहे. दुर्दैवाने हा प्रकल्प सुरू झाल्यापासून आजतागायत पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्यात आले नाही.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात बंद जलवाहिनीद्वारे पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. बंद जलवाहिनी केली तरी निर्धारित पाणीसाठा उचलण्यात यश न आल्यास या गावांना त्याचा उपयोग होणार नसल्याचे शिवतारे म्हणाले. मधल्या काळात शेतकऱ्यांना 19 टक्के दराने पाणी देण्याचा क्रांतिकारक निर्णय आपण घेतला पण पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध नसल्यानं येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. यात गंभीर बाब म्हणजे ज्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचं नियोजन केले जाते त्या बैठकीत या योजनेच्या अधिकाऱ्यांना बोलावले देखील जात नसल्याचा आरोप विजय शिवतारेंनी पत्रात केला आहे.