महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडी आरोपपत्रातून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे नाव काढले

मुंबई : बहुचर्चित जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनाल्याने (ईडी) आरोपपत्रातून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे नाव काढले आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र या आरोपपत्रात अजित आणि सुनेत्रा पवारांचं नावच नाही आहे. 2021 मधे ईडीने या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास 65 कोटींची मालमत्ता जप्त केली होती.अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित कंपनीच्या विरोधात हे आरोपपत्र आहे. मात्र आरोपपत्रात अजित आणि सुनेत्रा पवारांचं नाव नाही. अजित पवारांशी संबंधित या कंपनीला आरोपी बनवलं आहे. कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे. हे पुरवणी आरोपपत्र आहे. अजित पवार यांना ईडीने क्लीनचिट दिली की काय? अशी चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने पुरवणी आरोपपत्रं दाखल केलं आहे. या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. 2021मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. या घोटाळ्यात स्पार्कलिंग सॉइल लिमिटेड या कंपनीचं नाव आलं होतं.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी जवळपास बंद झाली. मात्र, 9-10 महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर चौकशीला पुन्हा वेग आला आहे. याप्रकरणी ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त केली होती. जवळपास 25 हजार कोटींचा हा घोटाळा आहे.
सहकारी बँक घोटाळ्यात स्पार्कलिंग सॉइल लिमिटेड या कंपनीचेही नाव होते. ही कंपनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.