राज्यात बुधवारपर्यंत (१९ एप्रिल) उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून नागपूर वेधशाळेने दक्षता घेण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मंगळवारी राज्यातील १५ शहरांतील पारा चाळिशीपार गेला होता. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नाशिकमध्ये पारा ३९.१ अंशावर होता.पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम असून उन्हाची तीव्रताही कायम आहे. विदर्भात सध्या उष्णतेची लाट सुरू असून दोन दिवसांनी पारा एक ते दाेन अंशाने घसरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. अलर्टमध्ये म्हटलं की, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. नागरिकांनी उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत शक्यतो बाहेर पडू नये.यानुसार, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धारशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ४० अंश सेल्सियसच्या पुढे नोंदवले गेले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत घराबाहेर पडणे, शारिरीक कष्टाची कामे टाळावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी राज्य सरकारनं एक कृती आराखडा तयार केला आहे. बीपी आणि मधुमेहाचा त्रास असणाऱ्या नागरिकांना काळजी घ्यावी 50 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे कर्मचारी आणि मजूर यांनी या उष्णतेच्या काळात काळजी घ्यावी. ज्या नागरिकांना बीपी आणि मधुमेह यांसारखे आजार आहेत (जे लोक बस ड्रायव्हर आणि पोलीस हवालदार) अशा लोकांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कामाच्या योग्य वेळांमध्ये बदल केला जाईल.
परीक्षांव्यतिरिक्त शाळा आणि कॉलेज हे सकाळच्या वेळेत भरवता येईल. उष्णतेच्या काळात कार्बोनेटेड, उच्च प्रथिनेयुक्त पेये, चहा आणि कॉफी टाळावी असं आवाहन राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने या वर्षीच्या उन्हाळ्यापूर्वी जारी केलेल्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी कृती आराखड्यात या निर्देशांचा उल्लेख करण्यात आला आहे. मजुरांसाठी कामाच्या सुरक्षीत वेळा ठेवाव्यात. यामध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला प्राधान्य द्यावे. उष्णतेचा त्रास होणाऱ्या लोकांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वॉर्ड राखून ठेवावेत अशा सूचना राज्य सरकारनं केल्या आहेत.
