पोलिसांवर हात उचलणं पडलं महागात; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला राहत्या घरातून मध्यरात्री अटक

कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बारामतीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. यवत पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली. डॉ. वंदना मोहिते असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा डॉक्टर सेलची अध्यक्ष आहे. यासंदर्भात पोलीस नाईक नितीन भानुदास कोहक यांनी तक्रार दिली आहे.

आषाढी वारी निमित्त कासुर्डी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता. या मार्गावरून पुणे शहराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. पोलीस नाईक नितीन कोहक हे त्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. दरम्यान वंदना मोहिते या मोटारने त्या ठिकाणी आल्या. यावेळी पुण्याकडे जाण्यासाठी त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. वंदना मोहिते यांनी नितीन कोहक यांच्या कानाखालीदेखील मारली. त्यानंतर गाडीतून खाली उतरत त्यांनी बॅरिकेट बाजूला केले आणि निघून गेल्या.

याप्रकरणी यवत पोलिसांनी वंदना मोहिते यांना गुरुवारी रात्री उशिरा राहत्या घरातून अटक केली आहे.दरम्यान, या घटनेनंतर यवत पोलीस ठाण्यात वंदना मोहिते यांच्याविरोधात भा.द.वि. कलम ३५३, ३२३, ३३२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोहिते यांना त्यांच्या घरातून रात्री उशिरा अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.

गेल्या महिन्यात पुण्यातील औंध रोड येथे स्पायसर कॉलेज परिसराजवळ झालेल्या छोट्या अपघातानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने वाद घातल्याचे पाहायला मिळाले होते. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. या प्रकरणी एका महिलेने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. महिलेने दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी भादवि 354 (ए) (4), 324, 504, 506, 327 अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला होता.