अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर आक्षेपार्ह पोस्ट, सीए विरुद्ध गुन्हा दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट करणं एका सीएला चांगलंच महागात पडलं आहे. अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका ट्वीटवर छत्रपती संभाजीनगर शहरामधील एका सीएने आक्षेपार्ह कमेंट केली. ही बाब लक्षात येताच शहरामधील भाजप पदाधिकाऱ्यांनी याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ त्या सीएला ताब्यात घेतले आहे. अतिष ओमप्रकाश काबरा (वय 35, रा. नरहरी वसंत विहार, न्यू एसबीएएच कॉलनी, ज्योतीनगर) असे त्या आरोपीचे नाव आहे.

सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी अतिषच्या प्रोफाईलवरून त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतली. भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांच्या तक्रारीवरून आतिष काबरा याच्याविरोधात भादंवि २९२, ५०९ सहकलम ६७, ६७ (अ) आयटी अॅक्ट २००० नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमृता फडणवीस या स्वत: सुंदर गातात. यासह राजकीय घडामोडींवर देखील त्या आपले मत व्यक्त करतात. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांना एका महिलेने धमकावून १ कोटी रुपयांची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला होता.

गेल्या काही दिवसांत सायबर पोलीस अधिक सक्षम झाले आहेत. नवनवीन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेरच्या माध्यमातून सोशल मीडियावर होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवणे पोलिसांना सोपे झाले आहेत. त्यामुळे सायबर पोलीस 24 तास पेट्रोलिंग करत असतात. सोशल मीडियावर पडणाऱ्या प्रत्येक पोस्टवर त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे आक्षेपार्ह कमेंट, पोस्ट किंवा व्हिडिओ-फोटो टाकल्यास तत्काळ पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. तसेच गुन्हा दाखल झाल्यावर जेलची हवा देखील खावी लागते. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर करतांना काळजी घेतली पाहिजे.