पूर्वमोसमी पावसाची दडी, मॉन्सूनचे लांबलेले आगमन यामुळे यंदाच्या जूनमध्ये राज्यात ११३.४ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या अवघा ५४ टक्के पाऊस पडला आहे. मराठवाड्यात पावसाची दडी असल्याने केवळ ३१ टक्के पाऊस पडला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातही पावसाची तूट राहिली आहे. महिन्याअखेरीस झालेल्या पावसाने काहीशी तूट भरून आली आहे. आता या महिन्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जूनमध्ये पालघरमध्ये सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वात कमी पाऊस पडला.
11 जून रोजी तळकोकणात मान्सून दाखल झाला आणि 23 जूनपर्यंत तो तिथंच रेंगाळला. पुढे तो विदर्भात दाखल झाला आणि त्यानंतर मुंबई पुण्यासह राज्याच्या उर्वरित भागांना व्यापलं. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूननं जोर धरला खरा. पण, जूनची सरासरी मात्र त्यानं भरून काढलेली नाही ही बाब नामकारता येत नाही. सध्याच्या घडीला जुलै महिन्याची सुरुवात तरी समाधानकारक असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सोमवारी रत्नागिरीसह कोकणाचा दक्षिण पट्टा, सातारा आणि कोल्हापुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रायगडमध्येही पावसाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि पुण्यात पावसाचा यलो अलर्ट असेल. तर, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, अमरावरी, वर्धा, नागपूर या भागांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा सहा दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे. देशात सर्वदूर मोसमी पावसाच अनुकूल वातावरण आहे. पुढील पाच दिवस देशाच्या बहुतेक भागांत चांगला पाऊस पडेल, असे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.कोकणातील पावसात २८ मिमीची तूट आहे. मध्य महाराष्ट्रात १५७.७ मिमी पाऊस पडतो, यंदा तो केवळ ७७.४ मिमी झाला असून ५१ मिमीची तूट आहे. मराठवाडय़ात सरासरी १३४.७ मिमी पाऊस पडतो, यंदा ४१.३ मिमी पाऊस झाला आहे. मराठवाडय़ात ६९ मिमी पावसाची तूट आहे.
