राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केलं आहे. त्यांच्यासोबत 40 आमदारांनी बंड केलं आहे. अजित पवार हे राज्यातील शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. या सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत इतर आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष अॅक्शन मोडमध्ये आला आहे. राष्ट्रवादीने थेट या मंत्र्याना अपात्र करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे धाव घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ९ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका सादर केली आहे. मला ती याचिका मिळाली आहे. त्या याचिकेत नेमकं काय म्हटलं आहे हे पूर्ण वाचल्यानंतर संपूर्ण अभ्यास करून कायदेशीर रित्या योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेनार्वेकरांनी सांगितलं”अजित पवारांना किती आमदारांचं पाठबळ आहे? असा प्रश्न विचारला असता राहुल नार्वेकर म्हणाले, “अजित पवारांना किती आमदारांचं पाठबळ आहे याविषयी मला अद्याप कोणतीही माहिती नाही.”
अजित पवार यांना किती आमदारांचं समर्थन आहे हे मला माहीत नाही. त्याची यादी माझ्याकडे आली नाही. त्यामुळे या मुद्द्यावर मी काहीच सांगू शकत नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले. सभागृहात विरोधी पक्षनेत्याची निवड विधानसभा अध्यक्ष करतात. विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार हा अध्यक्षांचाच असतो. विधानसभेचे जे नियम आहेत त्यानुसार आणि संवैधानिक तरतुदीनुसार पुढील निर्णय घेणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्षाच्या धोरणाच्या आणि पक्षाच्या हिताच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ सदस्यांनी राजभवन येथे जाऊन शपथ घेतली. त्यांची ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेवून ही कृती करण्यात आली आहे. ही कृती बेकायदेशीर आहे. असं जयंत पाटील यांनी सांगितलं
