राज्यात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. खासदार अमोल कोल्हे आधी अजित पवार यांच्यासोबत होते. मात्र, त्यानंतर त्यांनी शरद पवार यांचे बाप हा बाप असतो असे स्टेट्स ठेऊन पुन्हा शरद पवार यांच्या गटात सामील झाले.मात्र त्यांनी आता राजीनामा देण्याची मनीषा व्यक्त केली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवारांसह ९ मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार दिसले.त्यात खासदार अमोल कोल्हेंचाही समावेश होता. त्यामुळे चर्चांना उधाण आले.मात्र सोमवारी (३ जुलै) अमोल कोल्हेंनी ट्वीट करत ते शरद पवारांबरोबर असल्याचं स्पष्ट केलं.आता त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचं जाहीर केलं.
आतला आवाज ऐकत शरद पवारांबरोबर असल्याचं जाहीर करत असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले. यावेळी त्यांनी शपथविधीच्या हजेरीवरही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले मी वेगळ्या कामासाठी अजित पवारांकडे गेलो होतो. तेथे गेल्यावर आपल्याला भाजपाबरोबर जावं लागू शकतं असं कानावर घालण्यात आलं होतं. मात्र लगेच शपथविधी आहे हे माहिती नव्हतं.
राष्ट्रवादीचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार आहेत.अमोल कोल्हे यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षात पडलेली फूट आणि झालेली द्विधा मनस्थिती यातून अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमोल कोल्हे आजच शरद पवार यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपविणार आहेत. रविवारपासून राष्ट्रवादीत नाट्यमय घटना घडत आहेत.अजित पवार यांच्या शपथविधी वेळी कोल्हे हे उपस्थित होते. पण त्यांनी आता खादारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अमोल कोल्हे यांनी काल शरद पवार यांच्याशी संपर्क साधला होता.तसेच मी तुमच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं.तसेच खासदारकीबाबत निर्णय घेणार असल्याचंही म्हटलं होतं. त्यावर मी उद्या मुंबईत आहे. उद्या या बोलू. तुम्हाला जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या असा सल्ला शरद पवार यांनी त्यांना दिला होता. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
