सरकारच्या मनात नेमकं काय ? मराठा आरक्षणावरुन फडणवसांनी सोडले टीकास्त्र


मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा सुरु झालेली आहे. मात्र यावेळी ही चर्चा सरकारच्या विरोधात असल्याचे दिसून येते.  मराठा आंदोलनाच्या मुद्यावर सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले कि, “सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण आज अडचणीत आले आहे. ज्या प्रकारे राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या केस मध्ये घोळ घालतंय, राज्य सरकारच्या मनात नेमकं काय आहे, हेच लक्षात येत नाही. ज्या पद्धतीने सरकार या प्रश्नाला हाताळतं आहे, माझ्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहे.” असे म्हणत त्यांनी सरकार वर निशाणा साधला आहे.

फडणवीस यांचे म्हणणे आहे कि, सरकार मराठा आरक्षण या विषयावर एक ठाम भूमिका घेऊ शकत नाहीये, आणि त्यामुळेच दरवेळी एक नवीन भूमिका घेतल्या कारणाने घोळ होत आहे. मराठा आरक्षणाची सद्य स्थिती पाहता सरकारच्या मनात नेमकं काय आहे, हा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.

“सरकारने या विषयी कमिटी तयार केली, मात्र ती कमिटी काय निर्णय घेते, कोणाशी चर्चा करते हे मात्र काही समजत नाही. हा प्रश्न अतिशय वाईट प्रकारे हाताळला जातो आहे.” अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.


भाजप सरकारच्या काळात मराठा आंदोलनं, मराठा मोर्चे मोठ्या प्रमाणात झाले, मात्र भाजप सरकार ते हाताळण्यास सक्षम ठरले असे चित्र दिसून आले. मराठा आरक्षणाचा मार्ग देखील मोकळा झाला होता, मात्र पुन्हा काही नवीन पिटीशन्स लागू करण्यात आले, आणि सर्वोच्च न्यायालयात या विषयी सुनावणी होणार होती, मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीला स्थगिती दिली आहे. आणि पुढील सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

एकूणच सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन घोळ होत असताना दिसतोय, तसेच सरकारला देखील याविषयी खात्रीशीर ठाम निर्णय घेता येत नाहीये असे चित्र देखील स्पष्ट होत आहे. आता याविषयी पुढे काय होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.