अण्णांनी केले आपले उपोषण रद्द, केंद्र सरकारच्या मागणीचा ठेवला मान

अण्णा हजारे शेतकरी कायद्याच्या विरोधात उपोषण करणार अशी माहिती अण्णांतर्फे आली होती. दिल्ली येथे जागा न मिळाल्यास आपण राळेगणसिद्धी येथे उपोषण करू असे देखील अण्णांनी जाहीर केले होते, मात्र आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हा केंद्र सरकारच्या विनंतीला मान देत अण्णांनी हे उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते, हे उपोषण कृषि बिल विरोधात होते, तसेच शेतकऱ्यांना पाठींबा देणारे होते. मात्र २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या गदारोळानंतर आणि हिंसाचारानंतर आज जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या मागणीचा मान राखत उपोषण रद्द केले, आणि जाहीर पत्रकार परिषदेत उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले.


हे उपोषण महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच उद्या ३० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. तसेच ‘माझ्या आयुष्याचे हे अखेरचे उपोषण असेल’, असे देखील अण्णांनी जाहीर केले होते. मात्र एकूण सद्य परिस्थिती पाहता अण्णांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. तसेच अण्णांच्या विविध मागण्यांच्या अनुसार केंद्रीय कृषि मंत्री, नीति आयोगातील सदस्य आणि अण्णा हजारे अशी एक समिती देखील गठित करण्यात येत आहे, ज्यामाध्यमातून कृषिबिलाविषयी अधिक चर्चा होऊ शकेल, आणि यथायोग्य समाधान निघू शकेल.

दिल्ली येथील परिस्थिती एकूणच बिकट झाली आहे. २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांचे नाव घेत आंदोलनकाऱ्यांनी जो हिंसाचार केला आणि तिरंग्याचा अपमान केला, त्यानंतर संपूर्ण देश निषेध व्यक्त करतोय, असे असताना अण्णांचे उपोषण जर दिल्लीला झाले असते, तर कजाचित त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली असती. एकूण सर्व परिस्थिती पाहता, अण्णा हजारे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केंद्र सरकार ने केली होती, जी अण्णांनी मान्य केली आहे. गेल्या वेळी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर अण्णांनी आपले उपोषण मागे घेतले होते. आता अण्णांचे पुढचे पाऊल काय असेल हे बघणे महत्वाचे ठरेल.