सरकारी विमान कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही, सरकारमध्ये इतका अहंकार का ?

“राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात, राज्यपाल हे पद आहे, व्यक्ति नाही. राज्याचे सरकार आणि मुख्यमंत्र्यांची नेमणूक हे राज्यपाल करत असतात, त्यामुळे त्यांना सरकारी विमानात बसवल्यानंतर खाली उतरविणे म्हणजे त्यांचा अपमान आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे, सरकारी विमान ही कुणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही. आघाडी सरकार मध्ये इतका जास्त अहंकार आला कुठून?” असा प्रश्न राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.



महाराष्ट्रात राज्यपालांना प्रवासासाठी सरकारी विमानाची आवश्यकता होती, त्यासाठी एक पत्र पाठवावे लागते, जे पाठवण्यात आले होते, याची फाइल देखील मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली होती, मात्र मुद्दाम, जाणीवपूर्वक राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना विमानात बसवल्यानंतर त्यातून उतरविण्यात आले. ही अपमानास्पद वागणूक आहे, आणि राज्याच्या राज्यपालांना अशी वागणूक देणे हे अतिशय चुकीचे आहे, असे मत महाराष्ट्राच्या जनतेचे आहे.

राज्याची प्रतिमा यातून मलीन होत आहे :

या घटनेमुळे राज्यपालांचे काहीच वाईट होणार नाही, मात्र यामुळे राज्याची प्रतिमा नक्कीच मलीन होत आहे. राज्यसरकारने पोरखेळ चालवलेला आहे, रस्त्यावरची भांडणं स्वत:हून उकरल्या सारखं आहे हे, याचा परिणाम राज्याच्या प्रतिमेवर होणार आहे. असे सरकार याआधी महाराष्ट्राने बघितले नाही.” अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

https://twitter.com/PawanDurani/status/1359766144408825857

राज्यपालांना मिळालेल्या वागणूकी विरोधात अनेक लोकांनी आपली मते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित केली आहेत.