
महाराष्ट्र विधावसभेचं हिवाळी अधिवेशन आता चांगलंच रंगात आलं आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये विरोधी पक्षाने अनेक महत्वाच्या मुद्यांवर सरकारची कान उघडणी करत सरकारला कोंडीत धरलं आहे. काल भांडुप येथे झालेल्या बालकांच्या मृत्युवर विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय संतापाने सरकारला जाब विचारला, सोबतच यावेळी राज्यात सरकारच्या सद्य परिस्थितीवर त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेच्या माध्यमातून भाष्य केलं आहे.
“जनसेवेस्तव असे कचेरी,
ती डाकूंची नसे गुहा,
मेजाखालून, मेजांवरतून
द्रव्य कुणाचे लुटू नका”
या ओळींच्या माध्यमातून फडणवीस यांनी सद्य सरकारच्या भ्रष्टाचारी कारभाराविषयी टीका केली. ते म्हणाले कि, “नियम 293 अन्वये दिलेल्या प्रस्तावानुसार सरकारी नोकर भरतीततील घोटाळ्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, त्यासाठी सरकारने परवानगी न दिल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू” अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
“कुठे गेली तुमची कर्जमुक्ती ? कुठे गेली शेतकऱ्यांची चिंतामुक्ती? वन टाईम सेटलमेंट योजना, 50 हजार रुपये प्रोत्साहनपर घोषणा होऊन 2 वर्ष झाले, ना शासन आदेश, ना अंमलबजावणी शेतकर्यांची फसवणूक तर केलीच. पण, महात्मा ज्योतिबा फुलेंचे नाव देताना किमान ती योजना फसवी नसावी.” असे देखील ते यावेळी म्हणाले.
एकूणच “अंधेर नगरी चौपट राजा” अशी काहीशी परिस्थिती सध्या राज्य सरकारची झाली आहे, असे चित्र विरोधी पक्षाच्या आविर्भावातून दिसून आले. आजच्या तिसऱ्या दिवशी या हिवाळी अधिवेशनात आणखी काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
