
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या उपहासात्मक टिप्पणी आणि आवाजांमुळे आज सभागृहात पुन्हा एकदा गरमा गरमी झाली. महाराष्ट्रात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर उपहासात्मक टिप्पणी केली. त्याविरोधात त्यांच्यावर सध्या कारवाई होणार असल्याचे चिन्ह देखील दिसून येत आहेत. या संपूर्ण विषयावर, “तुम्ही सूडाचे राजकारण करू नका” अशा शब्दात विरोधीपक्षाने सत्ताधारी पक्षाला खडे बोल सुनावले आहेत.
या विषयावर सभागृहात वातावरण तापले असताना विरोधी पक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “आम्ही नितेश राणे यांनी केलेल्या कृतीचे अजिबात समर्थन करत नाही. मात्र जे भास्करराव आज आरोप करताएत, त्याच भास्कररावांना छगन भुजबळ साहेब सभागृहात आल्यावर “हुप हुप” चिडवताना आम्ही बघितले आहे. आम्ही त्या कृतीचे देखील समर्थन करत नाही. सभागृहाबाहेर घडलेल्या अशा कुठल्याही घटनेचे आम्ही समर्थन करत नाही, मात्र जर सत्ताधारी पक्ष हे ठरवून आला असेल कि, अशा घटनेचा फायदा घेऊन ते एखाद्या सदस्याला निलंबित करतील, तर ते लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. तुम्ही सूडाचे राजकारण करू नका.”
“आम्ही लोकशाहीत लढणारे लोक आहोत, रडणारे नाही. आमचे १२ सदस्य निलंबित करण्यात आले, आणि त्यामुळे आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. याचा आम्हाला आनंद नाही, मात्र या सभागृहात कायदा पाळला जात नाही, संविधान पाळले जात नाही, आणि मनमानी प्रमाणे सदस्यांना एक एक वर्ष निलंबित करायचे, हे चालणार नाही. आमच्यावर कितीही निलंबनाच्या कारवाया झाल्या तरी आम्ही लढू. ज्या प्रकारे हे सगळं ठरवून चालले आहे, ते आम्हाला मान्य नाही.” असेही ते यावेळेला म्हणाले.
यावेळी सभागृहात अध्यक्ष महोदयांना प्रश्न विचारत फडणवीस म्हणाले कि, “ जर अशा पद्धतीने हा पायंडा पडला तर यापुढे कुठले ही सरकार विरोधकांना सभागृहात ठेवणार नाही, आणि लोकशाहीची हत्या होईल, हे बरोबर आहे का?” “तुमच्या आणि ज्यांचा तुम्ही निषेध करताए, त्यांची भाषा सारखीच आहे, मग तुमच्यात आणि त्यांच्याच फरक काय?” असा प्रश्न देखील फडणवीसांनी यावेळी सत्ताधारी पक्षाला विचारला.
एकूणच वातावरण तापलं आहे, आणि या चर्चेत महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार का नाही ? हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
