उद्याेजकता आणि महाविकास आघाडीची कार्यक्षमता!

अभिनेता रितेश आणि जिनेलिया देशमुख यांच्या उद्याेजकतेसाठी महाविकास आघाडी सरकारने दाखविलेल्या तत्परतेवर आता भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फॉक्सान-वेदांत सारख्या प्रकल्पांना जमिनी देण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारकडे वेळ नव्हता परंतु विलासराव देशमुख यांच्या सुनेसाठी लातूर येथे केवळ दहा दिवसात एमआयडीसीमध्ये भूखंड मंजूर करण्यात आला, असा आराेप भारतीय जनता पक्षाने केला आहे.



 लातूर एमआयडीसीसाठी  2019 पासून भूखंडासाठी 16 उद्योजकाची प्रतीक्षा यादी  हाेती. देशमुख दांपत्याने 23 मार्च 2021 राेजी देश ॲग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. 5 एप्रिलला त्यांनी जागेसाठी अर्ज केला होता. त्यांना 15 एप्रिलला लगेचच भूखंड मंजूर करण्यात आला. त्यामुळे अवघ्या १० दिवसात हा भूखंड मंजुर झाला.

22 जुलै रोजी त्यांच्याकडे भूखंडाचा ताबा देण्यात आला. यावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रितेश आणि जिनिलिया 50 टक्के भागधारक असलेल्या या कंपनीचे भागभांडवल 7.5 काेटी रुपये हाेते. तरीही लातूर जिल्हा सहकारी बॅंकेने  महिन्याभरातच त्यांना 120 कोटी रुपयांचे कर्जही मंजूर केले.