नवी दिल्ली : अपराजित विकास पुरुष ही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची प्रतिमा गुजरात निवडणुकीच्या निकालांनी पुन्हा एकदा उजळून निघाली आहे. गुजरातमध्ये मतांच्या विभाजनामुळे भारतीय जनता पक्षाचा विजय झाला असे म्हणणाऱ्यांना मतांच्या टक्केवारीने चाेख उत्तर दिले आहे. भारतीय जनता पक्षाला सुमारे 56 टक्के मते मिळाली आहेत. आजपर्यंतचा हा विक्रम असल्याचे मानले जात आहे.

पंतप्रधान माेदींचा हा करिष्मा असला तरी त्यामागे गेल्या 27 वर्षांची मेहनत आणि समाजाविषयीची तळमळ आहे. मोदींची विकास पुरुष ही प्रतिमा गुजरात मध्येच बनली. गुजरातमध्ये विकासाची परिभाषा बदलून टाकली. काही ठराविक लाेकांचा विकास म्हणजे विकास नाही तर त्याची फळे अगदी शेवटच्या घटकापर्यंत पाेहाेचायला हवीत. सर्वसामान्य माणसाला त्याचा लाभ व्हायला पाहिजे ही त्यांची कार्यशैली राहिली. अनेक सर्वेक्षणात हे दिसून आले आहे की माेदींनी केलेल्या विकासाच्या कामामुळेच लोक त्यांना मते देतात. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी गांधीनगर, अहमदाबाद, सूरत, भरूच, पाटनपुर, मेहसाणा और केवड़िया या शहरांचे रूप बदलून टाकले. गुंतवणुकीसाठी राज्यात वातावरण तयार केले. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. पण त्याअगाेदर गुजरातमधील पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी क्रांती केली. रुंद आणि प्रशस्त रस्ते, शाळा-महाविद्यालयांची स्थापना आणि राेजगाराची उपलब्धता यामुळे गुजरातचे आर्थिक वातावरणच बदलून गेले. त्यामुळे बेराेजगारीच्या मुद्यावर विराेधकांनी कितीही आकाडतांडव केले तरी गुजराती जनतेने त्याला मानले नाही.
भाजपच्या मतांची टक्केवारी पाहिली तर महिलांनी पुरुषांच्या तुलनेत जादा मतदान केले आहे. याचे कारण म्हणजे महिलाकेंद्रीत विकासाचे धाेरण माेदींनी आखले. घर, जमीनीच्या नाेंदणीत महिलांचे नाव असल्यास करामध्ये दिली जाणारी सुट, उज्वला गॅस योजना यासारख्या महिला सशक्तीकरणाच्या अनेक योजना मोदींनी राबविल्या. जनधन याेजनेच्या माध्यमातून महिलांच्या नावावर बॅंक खाते सुरू करून लाेकल्याणकारी याेजनांचा लाभ काेणत्याही भ्रष्टाचाराशिवाय मिळू लागला. त्यामुळे गुजरातमधील महिलांमध्ये मोदी लोकप्रिय बनले. पक्षाच्या सीमा दूर करून महिलांनी माेदींना मतदान केले. माेदींनी तयार केलेली महिला व्हाेटबॅंक हे जगातील एक उदाहरण बनले आहे.
माेदींनी अगदी लहानपणापासून शेतकऱ्यांचे दु:ख पाहिले हाेते. काॅंग्रेसच्या अनेक वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणून त्याची पिळवणूकच केली गेली हाेती. माेदींनी गाव हे विकासाचे केंद्र मानून काम केले. अगदी गाव पातळीपर्यंत पक्के रस्ते बनले. शेतीसाठी प्रत्येक गावात वीज उपलब्ध झाली. शेतकऱ्यांसाठी खास वीजवाहिन्या उभारल्या गेल्या. प्रत्येक गावात सहकारी, सरकारी आणि खासगी बॅकांचे जाळे निर्माण केले. त्यामुळे खेडी स्वयंपूर्ण बनली. गुजरात मध्ये अमूल डेअरीचा प्रयाेगा झाला हाेता. मोदींच्या सत्ताकाळात गावोगावी डेअऱ्यांची उभारणी झाली. दूध विक्रेत्या शेतकऱ्यांना दर आठवड्याला त्यांच्या बॅंक खात्यात पैसे मिळू लागले. यासाठी अत्यंत पारदर्शक यंत्रणा तयार करण्यात आली. यामुळे देशातील अन्य काेणत्याही भागापेक्षा गुजरातमधील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. देश आणि राज्य पातळीवर सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या. ‘डीबीटी’ म्हणजे थेट लाभार्थींपर्यंत काेणत्याही दलाला किंवा मध्यस्ताशिवाय मदत पाेहाेचत आहे.

मोदींनी गुजरातच्या भाजप संघटनेला मजबूत केले. प्रत्येक गावात, प्रत्येक विभागात भाजपच्या शाखा आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यांना समाजसेवेचा संस्कार माेदींनी दिला आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेबराेबरच पक्षाची यंत्रणा सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असते. सरकारी याेजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या नागरी तक्रारीची तड लावत असतात. त्यामुळे निवडणूक आल्यावर भूछत्रप्रमाणे उगविणाऱ्या पक्षापेक्षा भाजपच्या कार्यकर्त्याशी जनतेचे ऋणानुबंध निर्माण झालेले असतात. सत्ता हे साधन आहे, साध्य नाही हा विचार माेदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजविला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात अत्यंत विश्वासाने लाेक भाजपच्या कार्यकर्त्याचे मत विचारात घेतात. भाजपला मतदान करा सांगण्याची वेळच कार्यकर्त्यांना येत नाही. भाजप संघटनेचे मजबूत जाळे संपूर्ण गुजरातभर आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून देशाच्या पंतप्रधान पदापर्यंतचा माेदींचा प्रवास झाला असला तरी गुजराती जनतेशी असलेले नाते त्यांनी तुटू दिलेले नाही. जनतेशी थेट संपर्क साधणारा नेता अशी माेदींची ओळख आहे. हिच त्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे लाेकांचे प्रश्न, लाेकांच्या भावना समजावून घेण्यासाठी माेदींना स्थानिक पातळीवरील नेत्यांवर अवलंबून राहावे लागत नाही. त्यामुळेच 27 वर्षे सत्तेवर असूनही भाजपमध्ये दरबारी राजकारणाला थारा मिळालेला नाही. गुजरात निवडणुकीच्या काळात माेदींनी 30 हून अधिक सभा घेतल्या. अनेक ठिकाणी रोड शो केले. यावर टीकाही झाली. परंतु, जनतेमध्ये जाणे, त्यांच्याशी संवाद साधणे हा माेदींचा स्वभाव आहे. जमीनीवर राहून विचार करणारा नेता त्यातूनच घडला आहे.
मोदींनी गुजरातच्या जनतेला स्वाभिमान दिला. व्हायब्रंट गुजरात सारखे कार्यक्रम राबवून राेजगार उपलब्ध करून दिला. भाेंदू सामाजिक संघटनांचा विराेध माेडून काढून सरदार सराेवरासारख्या याेजना पूर्ण केल्या. कच्छ, साैराष्ट्राच्या दुष्काळी भागात पाणी पाेहाेचविले. गुजराती माणूस हा व्यापाराभिमुख आहे. व्यापारानिमित्त जगभर पसरला आहे. कोणत्याही परदेश दाैऱ्यात अनिवासी भारतीयांसाठी माेदी वेळ राखून ठेवतात. त्यांच्याशी संवाद साधतात. त्यामुळे मोदी हे गुजराती अस्मितेचे प्रतिक बनले.
विरोधकांचे मोदींवरील बेताल आरोप हे जनतेने गुजराती अस्मितेवर आराेप मानले. काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदी यांना रावण म्हटले. आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांनी गुजरात माॅडेलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या गुजरात माॅडेलने आपले आयुष्य सुकर केले त्यावरच शंका घेणाऱ्यांविषयी जनतेच्या मनात संशय निर्माण झाला. त्यामुळे यंदाची निवडणूक मोदी लढवितच नव्हते. त्यांच्या वतीने गुजरातमधील जनता लढवत हाेती. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपला दैदीप्यमान विजय मिळाला. गुजरातमधील जनतेने ही भेट देऊन माेदींच्या अपराजित विकासपुरुष प्रतिमेला माेठे बळ दिले आहे.
