दिल्ली हे दर दिवशी घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांसाठी प्रसिद्ध झालं आहे. निर्भया केस नंतर तर अनेकदा दिल्लीचे नाव महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सगळ्यात पुढे आहे. ते आज सिद्ध देखील झाले. आज सकाळी सुमारे ७:३०च्या सुमाऱ्यास दिल्लीच्या द्वारका भागात एका १७ वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी एसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये मुलीच्या चेहऱ्याला आणि दोन्ही डोळ्यांना इजा झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि पिडीतेला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसिड अटॅकमुळे मुलींचा केवळ चेहराच खराब होत नाही, तर संपूर्ण आयुष्य आणि स्वप्नांची राख रांगोळी होते. आज अशीच घटना दिल्लीतील १७ वर्षीय १२वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीसोबत घडली आहे. तिच्या वडीलांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सगळीकडेच हे प्रकरण सध्या चर्चेत आहे.
सकाळी ७:३०च्या सुमाऱ्यास पीडिता आपल्या लहान बहिणीसोबत रस्त्याच्या कडेने जात असताना, दोन तरुणांनी बाईकवर येऊन तिच्यावर हा हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोन क्षण पिडीतेला काही कळलेच नाही. आणि पुढच्या क्षणी ती चेहऱ्यावर हात ठेवून अतिशय वेदनेमुळे धावत जात असताना सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसली आहे.
मुलींवर होणारे हे एसिड हल्ले कधी थांबणार हा एक मोठा प्रश्न आहे. एकूणच या केसमध्ये पुढे काय होतं हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
