कथित फायरब्रॅंड नेत्या सुषमा अंधारेच शिवसेनेसाठी ठरल्या अडचणीच्या

मुंबई : शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाच्या कथित फायरब्रॅंड नेत्या म्हणून सुषमा अंधारे यांना समाेर आणले. मात्र, आता शिवसेनेसाठी त्याच अडचणीच्या ठरल्या आहेत. सातत्याने हिंदू धर्म विराेधी वक्त्यांमुळे वारकरी समाजाने संताप व्यक्त करत ज्या पक्षात अंधारे असतील त्याला मतदान करणार नाही, असे म्हटले आहे.



 अंधारे यांच्या विधानामुळे विश्व वारकरी सेनेने त्यांच्याविरोधात शपथ घेतली आहे. विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगासागर समुद्र किनाऱ्यावर शपथ घेत सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. मी आजपासून शपथ घेतो की, ज्या पक्षामध्ये सुषमा अंधारे राहतील त्या पक्षाला मतदान करणार नाही अशा प्रकाराचा शेटे यांचा व्हिडिओ समोर आला आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अनेक वारकरी अशाप्रकारे शपथ घेतील असे शेटे यांनी सांगितले.

सुषमा अंधारे यांनी भाषणात जे विधान केले त्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या. आळंदी येथे वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांना चपलेचा हार घातला. संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करा असा सल्ला वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंना दिला.  

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात सुषमा अंधारे यांचा हिंदू देवी-देवता आणि साधुसंताबद्दल वादग्रस्त विधानांची व्हिडिओ क्लीप व्हायरल होतेय. त्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. प्रभू राम, श्रीकृष्ण, संत ज्ञानदेव यांच्यावर अंधारे यांनी अवमानाजनक वक्तव्य केली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. हे आपले जुने व्हिडिओ असल्याची मखलाशी अंधारे यांनी केली आहे. याचा अर्थ त्या पूर्वी हिंदू धर्मावर टीका करत होत्या, असाच हाेताे. आता त्यांनी आपली भूमिका बदलली का? अशी टीकाही होत आहे.

राष्ट्रवादी पक्षाशी जवळीक केल्यानंतर त्यांनी हिंदू देवी – देवतांची, सण – उत्सवांची येथेच्छ खिल्ली उडवणे हाच आपला मुख्य कार्यक्रम केला.  सुषमा अंधारे पूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये हाेत्या. त्यावेळी हिंदू देवदेवता, सण, उत्सव यांची टिंगल टवाळी करण्याची त्यांना सवय हाेती. त्यांनी स्वत: 2006 साली बुद्धधर्माचा दीक्षा घेतली. त्यानंतर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्माची तुलना करत त्या हिंदू धर्मावर कठाेर शब्दांत टीका करायच्या. त्यांच्या टीका बाणांवरून स्वत: उध्दव ठाकरेही सुटलेले नाहीत.  2019 सालच्या विधानसभा निवडणुकांत त्यांनी उद्धव ठाकरेंचा बाप काढला होता, आदित्य ठाकरेंवरही अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. शिवसेनेचे कार्यकर्तेही या वेदना विसरले नाहीत. त्यामुळे अंधारे यांच्याबाबत सहानुभूती दाखवत नाहीत.